कुसुंब्यात बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

0

धुळे । नागपूर-सुरत महामार्गावरील कुसुंबा, ता. धुळे येथील भारतीय स्टेट बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तालुका पोलिसांनी काही तासातच चोरट्यांना अटक केली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर- सुरत महामार्गावरील कुसुंबा गावात साक्री रोडवर स्टेट बँकेची शाखा आहे. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी टॉमीच्या सहाय्याने बँकेचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तत्पुर्वी त्यांनी दरवाजा जवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर तोडली होती. त्यानंतर बँकेतील स्ट्राँग रूमचा दरवाजा तोडून आत घुसून टॉमीच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू दोघांकडून तिजोरी उघडली नाही.

पहाटे 5.45 वाजता बँकेचा सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले. आज सकाळी बँकेचा वॉचमन कामावर आला असता, त्याला बँकेचा मागचा दरवाजा उघडा दिसला. त्याने तत्काळ ही माहिती व्यवस्थापक प्रशांत मोदी यांना दिली. त्यांनी सदर माहिती पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बँकेतील इतर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. त्यात दोन चोरटे तोंडाला रूमाल बांधलेले दिसून आले.

त्यानंतर निरीक्षक वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ विलास पाटील, पो.ना सतिश कोठावदे, पो.काँ विश्वास हजारे, बापू बागले, प्रमोद ईशी, मंगलसिंग पवार यांनी काही तासातच चौगाव येथून चेतन नंदकिशोर बोरसे (वय 22) व चेतन भिका बोरसे (वय 19) रा. चौगाव यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*