यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेला चालना

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेला चालना मिळावी यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेला चालना द्यावी व तालुक्यातील पुरमेपाडा येथील लाभार्थ्यांचाही प्रस्ताव आले असून येथील जागेचा प्रश्न ग्रामस्थांना विश्वासात घेवून सोडविला जाईल त्यासाठी येथील वसाहतीसाठीही प्रशासकीय कामाला गती देण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी केल्या.
बैठकीत पारधी घरकुल योजना आणि विविध व्यवसायासाठी लाभार्थ्यांच्या इष्टंकातही वाढ करावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सन 2011मध्ये घोषीत करण्यात आली.
सदर योजना राबविण्यासाठी धुळे तालुक्यातील तिसगाव ढंढाणे या गावाची निवड करण्यात आली आहे. मात्र समाजकल्याण विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सदर योजना रखडली.
या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तिसगाव ढंढाणे येथील रहिवाशांनी कागदपत्राच्या पूर्ततेसह प्रस्ताव सादर केले आहेत.मात्र प्रशासकिय उदासिनतेमुळे संबधित लाभार्थ्यांना  उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.

म्हणून या योजनेला गती मिळून आम्हाला घरे मिळावीत म्हणून लाभार्थ्यांनी आ.कुणाल पाटील यांच्याकडे गार्‍हाणे मांडले.आ.पाटील यांनी संबधित विभागांच्या अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या दालनात बैठक बोेलविली.

सदर योजनेसाठी जागेची निवड करण्यात आली आहे. ग्रुप ग्रामपंचायत नगाव बु.यांच्या नावे असलेली गट क्र.22 मधील 2 हेक्टर जमीन देण्याचे प्रस्तावित केले आहे.

याबाबतचाही प्रस्ताव मंजुरीसाठी त्वरीत संचालकांकडे पाठविण्याच्याही सूचना आ.पाटील यांनी यावेळी केल्या.

पुरमेपाड्यातही प्रस्ताव-धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथेही सदर योजनेचा प्रस्ताव असून यासाठी 20 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

मात्र याठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने मुक्त वसाहत योजनेची कार्यवाही पुढे सरकत नसल्याचे समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी या बैठकीत सांगितले.

त्यावर ग्रामस्थांना विश्वासात घेवून जमीनीचा प्रश्न निकाली काढला जाईल त्यासाठी योजना न थांबवता त्याला पुढील कार्यवाहीसाठी गती द्यावी अशाही सूचना आ.पाटील यांनी यावेळी दिल्या.

 

LEAVE A REPLY

*