Type to search

धुळे

ट्रकची मोटरसायकलला धडक; महिलेला चिरडले

Share

कापडणे । मुंबई आग्रा महामार्गावर,  देवभाने फाट्यावरुन कापडण्याकडे   रस्ता ओलांडतांना मोटरसायकल स्वाराला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत मोराणे येथील पुष्पाबाई देविदास निकम (वय 47) यांना अक्षरश: चिरडले.  ट्रकने धडक दिल्यानंतर या महिलेचे मुंडके तुटून धडावेगळे झाले. हे मुंडके कंटेनर सोबत सुमारे सहाशे फूट फेकले गेले. तर मोटारसायकल स्वार देवीदास रंगराव निकम (वय 53) हे जखमी झाले. अपघात घडला यावेळी देवभाने फाट्यावर तुफान गर्दी जमली. यावेळी संप्तत जमावाने गतीरोधक टाकण्याची मागणी करत रास्तारोको केला. या फाट्यावर वेळोवेळी आंदोलन होऊनही उड्डानपुल न झाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले असुन पुन्हा एकदा उड्डानपुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कापडणे येथे चुलत व्याहींकडे अंत्ययात्रेला येतांना हा अपघात झाला.

आज (दि. 9) सकाळी बारा वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील मोराणे येथील रहिवासी पुष्पाबाई देविदास निकम (वय 47) व देविदास रंगराव निकम (वय 53) हे दाम्पत्य कापडणे येथील शालीग्राम जयराम पाटील यांच्या अंत्ययात्रेसाठी येत होते. यावेळी देवभाने फाट्यावर आल्यानंतर कापडणे गावाच्या दिशेने मोटर सायकल वळवत असतांना मागुन- धुळ्याकडुन येणार्‍या ट्रकने (क्र.युपी 72 ऐटी 5360) या मोटर सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटर सायकलस्वार देविदास निकम हे बाजूला फेकले गेले तर पुष्पाबाई निकम या थेट कंटेनर खाली आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, यात या मयत महिलेचे मुंडके तुटून परफटत सहाशे फूट ज्योती हॉटेलच्या पुढे पर्यंत फेकले गेले. ट्रक चालक अतिशय सुसाट वेगाने कंटेनर चालवत असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

हा अपघात झाल्यानंतर महामार्गावर कापडणे व देवभाने ग्रामस्थांनी रास्तारोको करत महामार्ग प्राधिकरण विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच याठिकाणी गतीरोधक टाकण्याची मागणी केली.

सदर अपघात झाल्यानंतर सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, अतुल पाटील आदी फौज-फाट्यासह देवभाने फाट्यावर तात्काळ दाखल झाले, सपोनि प्रकाश पाटील यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

यावेळी संतप्त जमावाने देवभाने फाट्यावर रास्तारोको करत गतीरोधक टाकण्याची मागणी केली. सोनगीर टोल नाक्याचे अधिकारी अपघात स्थळी येत नाहीत तो पर्यंत व गतिरोधक टाकले जात नाहीत तोपर्यंत रास्तारोको मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका यावेळी संतप्त ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थांचा संताप वाढत होता व अपघाताला एक तास उलटूनही सोनगीर टोल नाक्याचे अधिकारी अपघातस्थळी येत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सोनगीर टोल प्लाझाच्या पाचारण करण्यात आले. यावेळी सायंकाळपर्यंत गतीरोधक टाकण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको मागे घेतला. या रास्तारोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत वाहनांचा रस्ता मोकळा केला.

अपघात झाल्यानंतर ट्रक चालक सोनगीर पोलीस ठाण्यात जमा झाला. अपघातानंतर मयत पुष्पाबाई निकम यांना शवविच्छेदनासाठी सोनगीर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात मयत झालेल्या पुष्पाबाई निकम व जखमी देविदास निकम हे कापडणे येथील गोविंदा नारायण पाटील यांचे व्याही आहेत. मयत पुष्पाबाई निकम यांच्यामागे पती, तीन मुले, स्नुषा असा परिवार आहे. पुष्पाबाईंच्या निधनाने मोराणे गावावर शोककळा पसरली आहे, मनमिळावु स्वभावाच्या पुष्पाबाई निकम यांच्या अकस्मात निधनाने गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर देवभाने फाट्यावर उड्डानपुलाची होण्याबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!