Type to search

Breaking News धुळे नाशिक मुख्य बातम्या राजकीय

घरकुल प्रकरणातील आरोपींची नाशिकला रवानगी; नातेवाईकांनी फोडला हंबरडा

Share

धुळे (प्रतिनिधी) –

जळगाव घरकूल प्रकरणातील 38 आरोपींची आज सकाळी नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रसंगी जिल्हा कारागृहाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांसह बघ्यांची गर्दी झाली होती. अनेक कैद्यांसह त्यांच्या नातेवाईकांना अश्रु अनावर झाले होते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची देखील दमछाक झाली.

जळगाव घरकूल प्रकरणी विशेष न्यायाधीश डॉ. सृृष्टी निळकंठ यांनी गुन्ह्यातील सर्व 48 आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. निकाल लागल्यानंतर 10 आरोपींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तर उर्वरीत 38 आरोपींना आज नाशिक कारागृहात नेण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांसह बघ्यांनी सकाळी दहा वाजेपासुनच प्रचंड गर्दी केली होती. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सुरेश जैन यांच्यासह पुरूष आरोपींना बाहेर काढण्यात आले.

त्यांना कारागृहाच्या आवारातील पिंजरा गाडीत बसविण्यात आले. या आरोपींना कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारापासुन गार्डीमध्ये बसेपर्यंतच्या जागेवर पोलिसांनी दोन्ही बाजुनी संरक्षण कडे केले होते. नातेवाईकांनी आरोपींना भेटण्याचा प्रयत्न केला. पंरतू पोलिसांनी तो हाणुन पाडला.

त्यामुळे नातेवाईकांनी एकमेकांना हात देत निरोप दिला. यावेळी महिला कैद्यांना अश्रू अनावर झाले होते. तर काही महिला कैद्यांनी नातेवाईकांपाहुन हंबरडाच फोडला. तर अनेक नातेवाईकांना देखील अश्रु अनावर झाले होते. पुरूष व महिला कैद्यांची दोन्ही वाहने सकाळी 11.56 वाजता नाशिककडे रवाना झाल्या. कैद्यांची गाडी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर देखील नातेवाईकांनी रस्त्यावरच हंबरडा फोडल्याचे दिसून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!