पीक विमा योजनेची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा

0
धुळे । दि.21 । प्रतिनिधी-पीक विमा योजनेची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असून शेतकर्‍यांनी संबंधित रक्कम जमा झाल्याची खात्री बँकेत जावून करून घ्यावी.
काही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक प्रकाश सांगळे यांनी केले आहे
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना 2016-17 च्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे राज्य शासनाने दि. 5 जुलै 2016 अन्वये निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात खरीप हंगामात सदर योजना लागू करण्यात आलेली आहे.

ही योजना सर्व शेतकर्‍यांना लागु असून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना सक्तीची व कर्ज न घेणार्‍या शेतकर्‍यांना एैच्छिक स्वरुपाची होती.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीची विमा कंपनी म्हणून निवड झालेली होती. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणार्‍या घटीसाठी विमा संरक्षण देय होते.

जिल्ह्यातील ज्या महसुल मंडळांना पिकनिहाय विमा मंजुर झालेला आहे. त्यांनाच पंतप्रधान पीक विमा रक्कम देय आहे. जिल्ह्यातील 33 हजार 773 शेतकर्‍यांना पंतप्रधान पीक विम्याचे 18.90 कोटी रुपये वाटप केले आहेत.

ज्या महसुल मंडळात पीकनिहाय विमा मंजुर झालेला आहे, अशा शेतकर्‍यांनी ज्या बँकेच्या शाखांमध्ये आपला पीक विमा योजनेचा हप्ता भरलेला होता, त्या संबंधित बँकेकडे जावून आपल्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप 2016-17 ची विम्याची मंजुरीची रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी.

याबाबत प्रथमतः संबंधित बँकांचे शाखा व्यवस्थापक व नंतर रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी योगीराज अवघडे यांच्याशी संपर्क साधावा.

याबाबत तक्रार असल्यास लिखीत स्वरुपात तालुका कृषी अधिकारी व संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार नोंदवावी.

हवामान आधारीत फळ पीक विमा योजना 2016 मध्ये जिल्ह्यातील पिकांसाठी मृग बहारसाठी लागू करण्यात आला होता.

सहभागी झालेल्या सर्व 1142 शेतकर्‍यांना 5.89 कोटी रुपये फळपिक विमा मंजुर झाला आहे. सदर विम्यापोटी देय असलेली रक्कम इन्शुरन्स कंपनीने 1142 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याकरीता उपलब्ध करून दिलेले आहेत,असेही सांगळे यांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*