दहावा आरोपी गजाआड दोघांचा शोध सुरुच

0
धुळे । दि.1 । प्रतिनिधी-कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शेख हत्या प्रकरणातील दहावा संशयित आरोपी पोलिसांनी गजा आड केला असून उर्वरित दोन आरोपींचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी संशयित मारेकरी व त्यांना आश्रय देणारे अशा एकूण 16 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा शहरातील गोपाल टी हॉटेल समोर खून झाला होता.

यातील आरोपी घटनेनंतर पसार झाले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली होती. या घटने प्रकरणी 9 संशयित आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आली आहे.

तर दहावा संशयित आरोपी आबा भिका जगताप याला पोलिसांनी आज ताब्यात घेतले. तो शहरातील शांतीनगर येथे आज दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी त्याच्या घरी कुटुंबियांना भेटण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार एलसीबी पथकाने त्याच्या घरी जावून आबा जगताप याला ताब्यात घेतले. गुड्ड्याच्या खून प्रकरणात आबा जगताप हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

तर दि.31 जुलै रोजी गुड्ड्याच्या खून प्रकरणातील भद्रा उर्फ राजेश देवरे व अभय देवरे या आरोपींना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी योगेश जयस्वाल व राकेश सोनार या दोन आरोपींची वाहने पोलिसांनी जप्त केली आहे.

कुख्यात गुंड गुड्ड्या याच्या खून प्रकरणातील एकुण 16 संशयित आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुड्ड्याच्या शवविच्छेदनाचा 17 पानी अहवाल
कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. संबंधित डॉक्टरांनी याबाबत 17 पानी अहवाल दिला आहे.

या अहवालात नेमक्या काय बाबींचा उल्लेख आहे, हे समजू शकलेले नाही. त्याचप्रमाणे गुड्ड्याची हत्या करतांना मारेकर्‍यांनी गावठी पिस्तुलचा वापर केला होता.

त्यावेळी झाडण्यात आलेली गोळी आणि त्यातून झालेला अतिरक्तस्त्राव या संदर्भातील नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल एका महिन्यानंतर प्राप्त होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*