Type to search

धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचे परिपूर्ण नियोजन करा!

maharashtra धुळे मुख्य बातम्या राजकीय

धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचे परिपूर्ण नियोजन करा!

Share
धुळे । धुळे लोकसभा मतदारसंघात 23 मे रोजी सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदाम क्रमांक 2, नगावबारी, देवपूर, धुळे येथे मतमोजणीस सुरवात होईल. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिपूर्ण व सूक्ष्म नियोजन करून मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकार्‍यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक राजु भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे, सुरेखा चव्हाण, जिल्हा पुनवर्सन अधिकारी प्रज्ञा बढे, तहसीलदार किशोर कदम, कुंदन हिरे, अपर तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, स्थानिक निधी लेखाचे सहाय्यक संचालक बी. डी. पाटील, जिल्हा कोशागार अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असेही आवाहन श्री.रेखावार यांनी केले.

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांचे पहिला प्रशिक्षण वर्ग 17 मे रोजी दुपारी 3 वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह येथे होईल. तर दुसरा प्रशिक्षण वर्ग 22 मे रोजी दुपारी 3.30 वाजता होईल. फेरीनिहाय मतमोजणीची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा या अ‍ॅपवर मिळेल. तसेच फेरीनिहाय मतमोजणीची माहिती देण्यात येणार आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित राहिल. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी भोजन, पाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक मतमोजणीच्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तसेच स्वच्छतेसाठी दोन पथकांची नियुक्ती करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी मतमोजणी केंद्रावरील संगणक व्यवस्था, माध्यम कक्ष, मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांना वेळोवेळी पाठवायचे अहवाल याविषयी सविस्तर आढावा घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भामरे यांनी मतमोजणी प्रक्रियेची माहिती दिली.

मतमोजणीच्या 19 फेर्‍या
मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 20 या प्रमाणे एकूण 120 टेबल असतील. टपाली व इटीबीपीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे दहा व पाच टेबल राहतील. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक अलककुमार सहारिया यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता टपाली मतमोजणीला सुरवात होईल. मतमोजणीच्या एकूण 19 फेर्‍या होतील. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!