खान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव

0
धुळे । खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या यात्रेला उद्या दि.18 एप्रिल रोजी सुरुवात होत असून यात्रेच्या निमित्ताने मनोरंजनाची साधने, पाळणे, मिकीमाऊस, रेल्वे, मेरी गो राउंड तसेच विविध प्रकारचे स्टॉलची पांझरा नदी पात्रात उभारणी सुरु झालेली आहे. तसेच संपूर्ण मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशी माहिती श्री एकविरा देवी व रेणूका माता मंदीर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.

चावदसला दि.18 एप्रिल रोजी कुलधर्म कुलाचार, आरत्या, मानमानता, जावुळ, शेंडी उतरविण्याचा कार्यक्रम मंदीर परिसरात होणार असून भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी मंदीर परिसरात व मोकळ्या जागेत मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुळधर्म कुळाचार आणि आरत्या यांच्या स्वयंपाकासाठी पिण्याच्या पाण्याची सोय मंदीर परिसरात ट्रस्ट आणि महापालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. जाऊळ व शेंडी उतरविण्यासाठी ट्रस्टतर्फे नाभिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

चैत्र शु.पौणिमेस दि.19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता एकविरा देवीचा महाअभिषेक व पाद्य पुजन मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव व सौ.कमलताई गुरव यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता एकवीरा देवीचे पुजन तसेच पालखी रथ पुजन मान्यवरांच्या हस्ते होईल. एकवीरा देवी पालखी सोहळ्यास जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, पोलीस निरीक्षक श्री.सानप, श्री.अहिरे, नगरसेविका प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, कांतीलाल दाळवाले, पुष्पा बोरसे, माजी नगरसेवक कैलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शोभायात्रेला श्री एकवीरा देवी मंदिरापासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर शोभायात्रा देवपुरातील गल्ली नं.7 मधून बापुजी भंडारी गल्लीतून आग्रारोडने मोठ्या पुलावरुन नगरपट्टी मार्गाने गल्ली नं.6 मधील तुकाराम व्यायाम शाळेपासून चैनीरोड, गल्ली नं.5 रामभाऊ दाढीवाले खुंटांवरुन गल्ली नं.4 मार्गाने बालाजी मंदीरावरुन पारोळारोड रेलन क्लॉथ वरुन पुन्हा आग्रारोड राम मंदिरापासून मोठ्या पुलावरुन मंदिरात पालखी मिरवणूकीचा समारोप होईल.

या सर्व मार्गावर विविध संघटनांनी व भाविकांनी सडा रांगोळ्या काढून कमानी उभारण्यात याव्यात. तसेच व्यायाम शाळांनी आपल्या लेझीम पथक, ढोल ताशांसह शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे मधुकर गुरव, सदाशिव गुरव, मनोहर गुरव, चंद्रशेखर गुरव आणि सतीष चौधरी, पप्पु ठाकुर आदिंनी केले आहे.

LEAVE A REPLY

*