Thursday, April 25, 2024
Homeनगरदोन दिवसांत आणखी दहा शाळा सुरू

दोन दिवसांत आणखी दहा शाळा सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या सुचनेनुसार सोमवारपासून जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला होता.

- Advertisement -

हीच परिस्थिती बुधवारी तिसर्‍या दिवशी होती. पहिल्या दिवशी 1 हजार 209 शाळांपैकी 278 शाळा सुरू झाल्या होत्या. दोन दिवसांत त्यात दहाची वाढ होवून जिल्ह्यात 288 शाळा सध्या सुरू आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात नववी ते बारावी असे 2 लाख 84 हजार विद्यार्थी असताना तिसर्‍या दिवशी केवळ दहा हजार विद्यार्थी शाळेत आले होते.

करोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने 23 नोव्हेंबरला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे शिक्षकांची करोना चाचणी, शाळांचे निर्जंतुकीकरण अशी सर्व तयारी करून मोठा गाजावाजा करून प्रत्यक्षात सोमवारपासून शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, पहिल्या दिवशी अवघ्या 278 शाळा सुरू झाल्या होत्या.

त्यात दोन दिवसांत अवघी 10 शाळांची भर पडली आहे. शाळा सुरू करण्याचे प्रमाण हे ग्रामीण भागात जास्त आहे. जिल्ह्यात 1209 शाळांवर सुमारे 10 हजार शिक्षक असून त्यापैकी 9 हजार 559 शिक्षकांची करोना चाचणी झाली आहे. महापालिका हद्दीत नववी ते बारावीच्या 79 शाळा असून महापालिका हद्दीत 38 शाळा सुरू झाल्या आहेत.

संमतीपत्रांची संख्या 18 हजार

करोना संसर्गात शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा अंतिम निर्णयय पालकांवर सोडण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 11 हजार 419 पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र भरून दिले होते. ही संख्या दोन दिवसानंतर 18 हजारांपर्यंत वाढली आहे.

तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा

पारनेर 19, पाथर्डी 17, राहाता 8, राहुरी 8, संगमनेर 10, शेवगाव 24, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 20, अकोले 21, नगर 24, नेवासा 66, जामखेड 13, कर्जत 2, कोपरगाव 6 आणि नगर मनपा 38 शाळा.

श्रीरामपूरच्या 20 पुन्हा बंद, तर नेवाशाच्या 16 वाढल्या

जिल्ह्यात पहिल्या दिवशी सुरू झालेल्या शाळांच्या आकडेवारीत दोन दिवसांनंतर फरक पडला आहे. विशेष करून श्रीरामपूर तालुक्यात पहिल्या दिवशी 44 शाळा सुरू झाल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी पातळीवरून पाठविण्यात आला होता. त्यात दोन दिवसांत 20 शाळा बंद झाल्याचे जिल्हा पातळीवर कळविण्यात आले आहे. तर नेवासा तालुक्यात पहिल्या दिवशी 50 शाळा सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यात दोन दिवसांनी 16 शाळांची वाढ करण्यात आली आहे. यासह जामखेडमध्ये 4, नगर मनपा 2, संगमनेर 7, शेवगाव 7, आणि श्रीगोंदा तालुक्यात दोन शाळांची वाढ झाली आहे. तर पाथर्डी तालुक्यात 1, श्रीरामपूरमध्ये 20 शाळांची घट दाखविण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यात सुरू असणार्‍या शाळांची संख्या जैसे थे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या