जिल्ह्यातील ९ धरणे ओसंडली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचा ( Gangapur Dam )साठा 67 टक्कयांपर्यंत पोहचला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार ( Heavy Rain ) झोडपल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील एकूणच सर्वच भागात पाऊस झाला.

पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 9 धरणे 100 टक्के भरल्याने ओसाडून वाहू लागली आहेत. गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड समूहातील वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणार्‍या गिरणा धरणातील पाणीसाठा आठवडाभरात 34 वरून 92 टक्कयांवर पोहाचला आहे. तर एकूण उपयुक्त पाणीसाठाही 43 टक्कयांनी वाढून 80 टक्के झाला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच नऊ धरणे ओव्हर फ्लो झाली असून, 24 पैकी 19 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असला तरी जून महिन्यात पावसाचा जोर कमीच होता. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढू शकला नाही. याउलट पाण्याची मागणी अधिक असल्याने धरणांतील पाणीसाठा तळाला जात होता.अगदी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. परंतु जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने स्थानिक पातळीवरच पाण्याची उपलब्धता झाली आहे.

याशिवाय हा पाऊस धरणांसाठीही फायदेशीर ठरला असून, त्यांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये 1 जुलैला 15 हजार 327 दशलक्ष घनफुट पाणीसाठा होता. 10 जुलैला हा पाणीसाठा 24 हजार 617 दशलक्ष घनफुट झाला. त्यानंतरच्या सातच दिवसांत हा पाणीसाठा दुपटीहून अधिक वाढून 52 हजार 470 दशलक्ष घनफूटापर्यंत म्हणजेच 80 टक्कयांवर पोहोचला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *