डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅनडात निधन

0
 धुळे दि. ६ – खान्देशातील विधायक चळवळीतील अग्रणी व केले परिवारातील थोरले बंधू कॅनडा निवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांचे आज शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

कॅलगरी कॅनडा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही वर्षापासून कर्करोगाशी त्यांची झुंज सुरू होती. त्यावर उपचारांनी मात करीत ४ ते ५ वर्षे त्यांनी काढली.

अशाही अवस्थेत ते मायदेशी येऊन संस्थांचे कामकाज बघत असत व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असत.

गेल्या ३१ डिसेंबर २०१६ रोजी त्यांच्या धर्मपत्नी कमलिनी वाणी यांचे निधन झाले होते. त्या आणि डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची भगिनी सौ. पुष्पलता शिरोडे व त्यांचे बंधू चंद्रकांत केले (केले काका) नुकतेच कॅनडात कॅलगरी येथे जाऊन त्यांना भेटून आले होते.

त्यानंतर अवघ्या १५ दिवसात डॉ. जगन्नाथ वाणी यांनी जगाचा निरोप घेतला.

शालेय शिक्षण धुळ्यात, उच्चशिक्षण पुण्यात व विद्यावाचस्पती ही पदवी कॅनडात १९६० ते ६२ दरम्यानच्या कृषी महाविद्यालय धुळे व गोखले इन्स्टिट्युट पुणे येथील कालखंड सोडला तर त्यांची प्राध्यापक म्हणून पूर्ण कारकीर्द कॅनडातच गेली.

१९९६ साली ते कॅलगरी विद्यापीठातून निवृत्त झाले. दरम्यान त्यांनी अनेक कार्यानुभव घेतले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली.

मनोरूग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात व देशात अनेक उपक्रम राबविले. का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची धुळ्यात स्थापना, स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना, शारदा नेत्रालय, बधीर पुनर्वसन संस्था असे बरेच सध्या सुरू असलेले उपक्रम ही डॉ.जगन्नाथ वाणी यांची खान्देशाला देन आहे.

कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी या संस्थेची स्थापनाही त्यांनी केली. जागतिक संगीत अभ्यासक्रम सुरू केला. महाराष्ट्र मंडळाची कॅनडात स्थापना केली. अनेक संस्थांमध्ये ते संचालक होते.

जन जागृतीसाठी ‘देवराई’, ‘एक कप चा’ अशा काही चित्रपटांची व लघुपटांची निर्मिती, ग्रंथ प्रकाशन, अनेकविध पुरस्कार हे त्यांचे संचित आहे. २०१२ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता.

डॉ. वाणी राष्ट्रसेवादलाचे सैनिक होते. त्यांच्यावर सेवादलातून झालेल्या संस्काराचे त्यांनी सोने केले. परदेशात स्थायिक असूनही मायदेशांकडे अर्थात धुळ्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे.

त्यांनी स्थापन केलेल्या वैशिष्टयपूर्ण संस्था ही त्याची पावती आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे व भावंडे असा परिवार आहे.

डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या रूपाने एक बहुआयामी व विधायक दृष्टिचे व्यक्तिमत्व हरपले अशी भावना खान्देशातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*