डॉ.आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.गायकर उद्या धुळे जिल्ह्यात

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-आपल्या महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रीकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्योग जगताच्या गरजेनुरूप, रोजगाराभिमुख प्रगत होण्यासाठी राज्य शासनाने येत्या 2017-18 शैक्षणिक वर्षापासून राज्य स्तरावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ( डीबाटू ) ची स्थापना लोणेरे रायगड येथे केली आहे , या शैक्षणिक वर्षी अभियांत्रीकीचे शिक्षण घेऊ इच्छीणार्‍या सर्व संबंधित विद्यार्थी शिक्षक पालकांसाठी या नूतन विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर विद्यापीठाच्या अन्य पदाधिकार्‍यांसह दि. 21 जून रोजी सकाळी दहा वाजता स्टेशन रोडवरील हिरे भवनात मुक्त संवाद शिबीराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

या वर्षी उत्तर महाराष्ट्र क्षेत्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अभियांत्रीकी व औषधनिर्माण शास्त्र शाखेतील नऊ महाविद्यालयाना डीबाटू विद्यापीठाची संलग्नता मिळाली आहे.

या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, याप्रसंगी डॉ. गायकर हे मार्गदर्शनातून नविन तंत्र शास्त्र विद्यापीठाची संकल्पना मांडत विद्यापीठाची उपयुक्तता , महत्वाची वैशिष्टये , अभ्यासक्रमातील विशेष फरक, शिक्षकांचे प्रशिक्षण, सामूहिक प्लेसमेंट सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणारी बी टेक, एम टेक पदवी या व अन्य महत्वपूर्ण बाबीवर प्रकाशझोत टाकणार आहेत.

यावेळी कुलसचिव डॉ भामरे , डॉ एस के कट्टी , डॉ पेडसे व डीबाटू संलग्न महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्रतिनिधी,पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*