Type to search

maharashtra धुळे

दोंडाईचाचे कलिंगड थेट कतारला पोहचले!

Share
दोंडाईचा । दोंडाईचाचे कलिंगड (टरबूज) थेट कतारला पोहचलेय. येथील प्रगतशील शेतकरी, उद्योजक सरकारसाहेब रावल यांनी आपल्या 35 एकर शेतीत उत्पादित केलेले तब्बल 144 टन कलिंगड सहा कंटेनर भरून कतारला निर्यात केले आहेत. कतारमधील खवय्यांची पसंती मिळत असल्याने भारतातील बाजारांपेक्षा दुप्पट दराने कतारमध्ये दोंडाईचाचा हा कलिंगड विकला जातोय. दुष्काळाशी दोन हात करीत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना 75 वर्षीय सरकारसाहेब रावल यांची कृषी उद्योजकता मार्गदर्शक ठरते आहे.

समृद्ध राजकीय आणि संस्थानिक वारसा लाभलेल्या सरकारसाहेब रावल यांचे वय सध्या 75 वर्ष आहे. तरुणपणी त्यांनी बी.एस.सी अ‍ॅग्रीचे शिक्षण घेतले आणि उद्योग, शेतीत अनेक नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. आजही सकाळी 5 वाजेपासून त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळी 10 पर्यंत शेती नंतर उद्योग, पुन्हा सायंकाळी शेती असा त्यांचा दिनक्रम आहे.

आपल्या शेतात दरवेळी नवनवीन प्रयोग करीत असतांना काही वर्षांपूर्वी रावल यांनी 70 एकर जमिनीत ऊसाचे उत्पादन घेत एकरी तब्बल 84 टन उत्पादन मिळवले होते. गेल्या वर्षी कतारमध्येच 5 टन निंबूची निर्यात केली होती. कतारच्या डोहा शहराच्या बाजारपेठेत सरकारसाहेब रावल यांच्या निंबूची बरीच चर्चा झाली. त्यानंतर तेथील मागणीनुसार यंदा कलिंगडाचे उत्पादन घेण्यात आले असे रावल यांनी सांगितले.

यंदा सरकारसाहेब रावल यांनी आपल्या 35 एकर शेतात कलिंगडचे उत्पादन घेतले. आतापर्यंत सहा कंटेनर कतारला रवाना झाले. एक कंटेनरची क्षमता 24 टन कलिंगड नेण्याची आहे. भारतातील ठोक बाजारात कलिंगडला साधारण सात ते आठ रुपये प्रति किलो दर मिळतो. परंतु कतारला निर्यात होणार्‍या कलिंगडला सर्व खर्च वजा जाता 15 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळतो आहे.

जागतिक बाजारपेठेत शेतीमाल न्यावा!
शेतीमधून शेतकर्‍यांना मोठे उत्पादन घेता यावे, त्यांचा शेतमाल विदेशात निर्यात करता यावा, यासाठी आम्ही सुनयन अ‍ॅग्रो प्रा. ली. नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे कुणीही शेतकरी आपला माल विदेशाला पाठवू शकतात. त्यासाठी सर्व मार्गदर्शन आम्ही करित असतो. शेतकर्‍यांनी केवळ स्थानिक भारतीय बाजारपेठांवर अवलंबून न राहता जागतिक बाजारपेठेत आपला शेतमाल कसा पोहचेल याचे नियोजन करून पीकपाणी घेण्याची आवश्यकता आहे. जागतिक बाजारपेठेत असलेल्या संधीच शेतकर्‍यांनी सोनं करावं. त्यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका माझी राहिल.
-सरकारसाहेब रावल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!