दोंडाईचा पालिकेतर्फे नयनवृक्ष वनराई सप्ताह : 31 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

0
दोंडाईचा । दि.27 । प्रतिनिधी-दोंडाईचा येथील नगरपालिकेच्या वतीने दि.1 ते 7 जुलै पर्यंत नयनवृक्ष वनराई सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या काळात संपूर्ण दोंडाईचा शहरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
यासाठी दोंडाईचा पालिका आणि शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत या सात दिवसात 31 हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे, यासाठी काही झाडांना पिंजरे पालिकेकडून देखील तयार करण्यात येत असून सामाजिक संघटना देखील आप-आपल्या परीने वृक्षांचे संगोपन व्हावे म्हणून पिंजरे तयार करीत आहेत.
पालिकेच्या माध्यमातून ग्रीन दोंडाईचाचा संकल्प राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केला असून शहरात लावण्यात येणारी झाडे ही रंगबेरंगी असतील त्यातून शहराचे सौदर्य देखील फुलण्यास मदत होणार असून निसर्गाची परतफेड देखील होईल असा विश्वास नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल व या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक श्री.रमेश पारख, यांनी व्यक्त केला आहे.

दोंडाईचा नगरपालिका आणि शहरातील सर्व सामाजिक संघटना मिळून प्रत्येक प्रभाग निहाय वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक आणि संबंधीत संस्थेचे पदाधिकारी तेथे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असतील त्यांना मदतीला पालिकेचे कर्मचारी असतील असे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, या शाळा महाविदयालयांनी देखील सहभाग नोंदविला असून शहरातील प्रत्येक नागरीकाने या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

दरम्यान, या नयनवृक्ष वनराई सप्ताहाचे उद्घाटन दादासाहेब रावल उद्योग समुहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते ओम शांती केंद्र याठिकाणी करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, बांधकाम सभापती संजय मराठे, पाणीपुरवठा सभापती करणसिंह देशमुख, आरोग्य सभापती वैशाली महाजन, शिक्षण सभापती प्रियंका ठाकूर, महिला व बालविकास सभापती अफरीन बागवान, स्थायी समितीचे सदस्य रवि उपाध्ये यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित असतील. मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व 12 प्रभागांत वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

*