धुळे जिल्ह्यात सहा लाख 85 हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध

0
धुळे । जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 ते जुलै 2019 अखेरपर्यंत पाच लाख 94 हजार 351 मेट्रीक टन चार्‍याची आवश्यकता असून खरीप, रब्बी हंगाम, पशुसंवर्धन विभाग व डीपीसी निधीतून उपलब्ध होणारा एकूण चारा हा सहा लाख 85 हजार 119 मेट्रीक टन एवढा असेल. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात चार्‍याची टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे असे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. कमी पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाई सोबतच चाराटंचाई देखील भासण्याची दाट शक्यता आहे.

खरीप हंगामात झालेल्या पेरणीमुळे काही प्रमाणात चारा उपलब्ध झाला होता. मात्र अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने, रब्बीच्या पेरणीवर त्याचा परिणाम झालेला आहे. मात्र जिल्ह्यात जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, त्यातून काही प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो. जिल्ह्यात जनावरांची संख्या सहा लाख 99 हजार 694 एवढी आहे. त्यात नोव्हेंबर 18 ते जुलै 19 अखेरपर्यंत पाच लाख 94 हजार 351 मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. तर खरीप हंगामातील पिकापासून तीन लाख 27 हजार 815 मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. या शिवाय 2018 मधील रब्बी पिकांपासून 87 हजार 791 मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून 89 हजार 513 व डीपीसी निधीतून एक लाख 80 हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे. असा एकूण सहा लाख 85 हजार 119 मेट्रीक टन चारा जुलै 19 अखेरपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

टंचाईच्या परिस्थितीत चार्‍याचे उत्पादन वाढवून टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना ज्वारी व मक्याचे बियाणे वाटप करण्यात आले. यात मका 364.22 क्विंटल तर ज्वारीचे बियाणे 445.56 असे एकूण 809.78 क्विंटल बियाण्याचे वाटप करण्यात आल्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*