Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

धुळे जिल्हा विकासापासून दूरच; बेरोजगारांचा प्रश्न कायम

Share

धुळे । प्रतिनिधी

जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग जातात. पाण्याची सुविधादेखील पुरेशी असताना औद्योगिक उभारणी झालेली नाही. बेरोजगारांचा प्रश्न कायम आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांना मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे.
मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला लागून धुळे जिल्हा असून या जिल्ह्यातून तापी, पांझरा, कान, बुराई, अरुणावती, अनेर यांसारख्या नद्या वाहतात. अक्कलपाडा, मालनगाव, लाटीपाडा, जामखेडी, वाडी-शेवाळी, अनेर डॅम, अमरावती प्रकल्प, नकाणे, डेडरगाव तलाव यांसारखी धरणे असल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे. जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रस्त्यांचे जाळे विणले आहे.

नव्याने चार राष्ट्रीय मार्गांचा विकास आणि बळकटीकरणामुळे गुंतवणुकीच्या नव्या संधी जिल्ह्यात उपलब्ध होणे सहज शक्य आहे. रस्ते विस्तार व्हिजनमुळे गुजरात, मध्य प्रदेश, नाशिक, मुंबईसह राज्यातील विविध बाजारपेठा धुळे जिल्ह्याला जोडल्या गेल्या आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणे शक्य आहे. परंतु औद्योगिक विकास पुरेसा नाही. उद्योगधंदे नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही.
सोनगीर आणि दोंडाईचानजीक औष्णिक वीज केंद्रे उभारली जात आहेत. परंतु अद्याप त्याची उभारणी झालेली नाही. साक्री तालुक्यातील सौरऊर्जा प्रकल्पही जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु तरीदेखील या प्रकल्पातून वीज तालुक्यालाही पुरवली जात नाही. या तालुक्यातही भारनियमन होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या मार्गाचे भूमिपूजन गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. परंतु त्यानंतर या रेल्वेमार्गाबाबत कुठल्याही प्रकारची पूर्तता झालेली नाही. तसेच धुळे येथे ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानक आहे. परंतु या स्थानकातून केवळ चाळीसगावपर्यंत रेल्वे धावते. धुळ्याहून नाशिक, पुणे, मुंबई व नागपूर येथे दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. परंतु रेल्वेस्थानक असतानाही थेट रेल्वे नसल्यामुळे नागरिकांना चाळीसगाव येथे जावे लागते. त्यामुळे धुळ्याहून मोठ्या शहरांसाठी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

मुंबई-दिल्ली कॉरिडॉर प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. हा प्रकल्प पूर्ण झाला तर धुळ्याचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. धुळे महापालिकेत व जि.प.वर भाजपची एकहाती सत्ता आहे. परंतु धुळ्याचा विकास कोसो दूर आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे निवडून आले आहेत. तर भाजपचे काशिराम पावरा, जयकुमार रावल, काँग्रेसचे कुणाल पाटील, अपक्ष मंजुळा गावित, एमआयएमचे फारुख शाह हे विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!