धुळे-इंदूर रेल्वे विकासाचा मार्ग ठरेल ! – प्रभू

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-मनमाड- मालेगाव- धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात झाला असून तो रेल्वे मंडळाच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
लवकरच या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपुजन केले जाणार असून धुळेकरांच्या स्वप्नातील हा रेल्वेमार्ग वास्तवात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री ना.सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल, खा.ए.टी.पाटील, खा.डॉ. हीना गावित, आ.अनिल अण्णा गोटे, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.शर्मा यांच्यासह रेल्वे, जेएनपीटी आणि मध्य प्रदेश सरकारचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ना.डॉ.सुभाष भामरे, ना.जयकुमार रावल, महापौर सौ.कल्पना महाले, खा.डॉ.हीना गावित, खा.ए.टी.पाटील, खा.श्रीमती रक्षाताई खडसे, आ.स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी.

ना.प्रभू यांनी यांनी यावेळी सांगितले की, धुळे जिल्ह्याने आजपर्यंत राज्याला व देशाला खूप काही दिले आहे. मात्र जिल्ह्याला काही मिळाले नाही.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, औद्योगिक क्षेत्र वाढावे यासाठी पायाभूत सोयी सुविधांची गरज आहे आणि रेल्वेच्या माध्यमातूनच त्या उपलब्ध होवू शकतील.

रेल्वे जिल्ह्यात विकासाचा नवीन राजमार्ग तयार करेल, असा विश्वास व्यक्त करून ना. प्रभु म्हणाले की, या प्रकल्पासाठी सुमारे 3247 हेक्टर खासगी आणि सुमारे 300 हेक्टर वनविभागाची अशी एकुण 3538 हेक्टर जमिन भूसंपादन कायद्यानुसार संपादित केली जाईल.यात शेतकर्‍यांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून कार्यवाही केली जाईल.प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाहीत.

रेल्वेमार्गाचा आढावा- केंद्रीय रेल्वेमंत्री ना. प्रभू यांनी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा आज अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला. मंजूर झालेला मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग नाशिक, धुळे, जळगाव तसेच मध्य प्रदेशातील बडवानी, धार, पश्चिम निमाड आणि इंदूर जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गावरील महत्वाची स्थानके मालेगाव, नवीन धुळे, नरडाणा, शिरपूर, सेंधवा, धामणोद आणि महू असतील. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाचा 50 टक्के खर्च उचलण्यास संमती दिली आहे.

या मार्गाची एकूण लांबी 357.37 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून 186 किलोमीटर, तर मध्य प्रदेशातून 171.37 किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित खर्च 8857.97 कोटी रुपये असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

ना.प्रभू यावेळी म्हणाले, देशाला 7,600 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे बंदर विकासासाठी रस्ते व रेल्वे एकमेकांना जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गावांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे.

जळगाव-उधना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरुन भुसावळ जळगाव-नंदुरबार-उधना- बांद्रा अशी भुसावळ-मुंबई नवी गाडी सुरू करण्यात येईल. तसेच दादर-अमृतसर एक्प्रेसला धुळ्याहून एक एसी प्रथम श्रेणी व एसी द्वितीय श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येईल. धुळे-पुणे कोचला मिळणारा प्रतिसाद पाहून आवश्यकता भासल्यास या डब्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही प्रभु यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे म्हणाले की, धुळेकरांच्या स्वप्नातल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी 50 टक्के खर्च रेल्वे, तर 50 टक्के खर्च राज्य शासन उचलणार आहे.

त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी स्थापन झाली आहे. केंद्रीय जहाज बांधणी व भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा जहाज बांधणी विभाग 50 टक्के खर्च उचलणार आहे.

रोहयो मंत्री श्री.रावल म्हणाले, मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग तयार करताना धुळे-नरडाणा मार्गासही प्राधान्य द्यावे.तसेच भुसावळ-जळगाव- नंदुरबार-सुरत मार्गे मुंबईसाठी नवी गाडी सुरू करावी. दादर-अमृतसर एक्स्प्रेसला वातानुकूलित श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी केली.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील विविध उपक्रमाचे भूमिपूजन तसेच पुणे आणि धुळे दरम्यान महाराष्ट्र एक्स्प्रेसला धुळे येथून दोन स्लीपर डबे जोडण्याचा शुभारंभ धुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे मंत्री ना.सुरेश प्रभू यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

 

 

 

LEAVE A REPLY

*