भरवस्तीत दारु दुकान, बिअरबारला परवानगी देवू नका !

0
धुळे । दि.15 । प्रतिनिधी – शहरातील देवपूर परिसरात असलेल्या जयहिंद कॉलनी, आनंदनगर, मयुरकॉलनी, प्रमोदनगर, प्रोफेसर कॉलनी, वाडीभोकररोड, भरतनगर, एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, रामनगर या रहिवास परिसरात परमिट रुम, बियर शॉपी, वाईन शॉप या दारु दुकानांना परवानगी देवू नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.मनोहर अंचुळे यांना घेराव घालण्यात आला.
सुप्रिम कोर्टाने महामार्गालगतची तसेच 500 मीटर अंतरावरील परमीटरुम, वाईन शॉप, बियरबार सदरील सर्व दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे धुळे शहरातील समस्त परमिटरुम, बियरशॉपी, वाईन शॉपधारक यांचे धाबे दणाणले आहे.
त्यामुळे हे सर्व दारु किंग उच्चभ्रु वस्तीत धाव घेत आहे. यातच जयहिंद कॉलनी, आनंदनगर, मयुरकॉलनी, प्रमोदनगर, प्रोफेसरकॉलनी, वाडीभोकररोड, भरतनगर, एसआरपी कॉलनी, नकाने रोड, रामनगर या रहिवास परिसरात परमिट रुम, बियर शॉपी, वाईन शॉप यांचे किमान 10 ते 12 प्रस्ताव धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर झाले आहे.

शिक्षणमहर्षी नानासाो.कै.झेड.बी.पाटील यांच्या अथक परिश्रमाने व त्यागाने पावन झालेला जयहिंदचा परिसर शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखला जातो.

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून यावे, तसेच चांगली भावी पिढी निर्माण व्हावी यासाठी जयहिंद शैक्षणिक संस्था परिश्रम घेत आहे.

परंतु दुर्देवाने अशा शैक्षणिक पुण्यभुमित परमिटरुम, बियरशॉपी, वाईनशॉप अशा प्रकारचे दारुचे दुकान सुरु होणार असून ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.

सद्यस्थितीत वाडीभोकर रस्तालगत मौजे वलवाडी, सर्वे नं.36/2 ब पैकी प्लॉट नं.3 येथील गाळयांमध्ये नविन परमिटरुम, वाईन शॉप यांना परवानगी देण्यात येत आहे.

सदर ठिकाण शिक्षणमहर्षी नानासाो.कै.झेड.बी.पाटील महाविदयालयाच्या मेनगेट पासून तसेच समोर शालीमार कॉम्प्लेक्समधील डीएमएलटी कॉलेज पासून फक्त 70 ते 80 मी.च्या आत आहे.

तसेच या परिसरात हाकेच्या अंतरावर अनेक धार्मिक स्थळे आहेत. येथे यापूर्वीच अस्तित्वातील परमिटरुम, बियरशॉपी, वाईन शॉप या दारु दुकानांमुळे दारु पिणारे दुकानातून दारु विकत घेवून तेथेच पायर्‍यांवर दारु पिण्यास बसतात.

तेथेच लघुशंका करतात, थुंकतात आणि त्यांची वाहने नागरीकांच्या घरासमोर लावतात. यामुळे येथील स्थानिक रहिवासी आणि या मद्यपी लोकांमध्ये अनेकदा मोठे वाद निर्माण झाले आहेत.

यामुळे कॉलेज आणि रहिवासी क्षेत्रात परमिट रुम, बीयरबार, वाइर्र्न शॉपीला परवानगी देवुन धुळे राज्य उत्पादक शुल्क विभाग गैर कारभाराचा अनोखा नमुना पेश करत आहे.

पैशाच्या बळावर दारु किंग शहरात कुठेही बियर शॉपी आणि दारुचे दुकाने सुरु करुन तरुण पिढीला व सदर परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बरबाद करण्यासाठी चांगलेच पुढे सरसावले आहे.

या सार्‍या प्रकरणात धुळे राज्य उत्पादक शुल्क विभाग आणि हे दारुकिंग जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस अधिक्षक तसेच तमाम नागरीकांची दिशाभुल करीत असून यात सदर विभागात मागील एक महिन्यात तब्बल 10 ते 12 परमिट रुम, बियरबार, वाईन शॉपी यांना नियमांची पायमल्ली करुन परवानगी देण्याचा धडाका सुरु केला आहे.

त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या बंदी आदेशा नंतर दिलेल्या सर्व परवानग्या रदद् करुन परिसरातील महिला, महाविद्यालयीन तरुणी यांना याचा मोठया प्रमाणावर त्रास होणार आहे.

तसेच दारु पिण्यास येणार्‍या मद्यपिंमुळे या परिसरातील महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांच्या भविष्यावरही मोठा परिणाम होणार आहे.

याठिकाणी काही गुंड, टवाळखोर, टारगट मुले दिवसभर तेथे बसून असतात आणि महाविद्यालयीन तरुणी, महिलांची छेड काढतात. सर्व परिसरात कुठल्याही प्रकारची परमिट रुम, बियरबार, वाईन शॉपी या दारु दुकानांना परवानगी देण्यात येवू नये.

अथवा परवानगी दिली असेल ती ताबडतोब रदद् करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात सौ.प्रतिभा चौधरी, प्रा.सागर चौधरी, मधुकर देवरे, रमेश बोरसे, अजबराव बोरसे, ताराचंद पाटील, शैला कुलकर्णी यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*