Type to search

धुळे

धुळ्यात चोरट्यांची दिवाळी सुरूच

Share

धुळे । शहरात गेल्या काही दिवसांपासुन चोरी, घरफोडीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे धुळेकरांचे दिवाळे निघत असून चोरट्यांनी दिवाळी सुरू असल्याचे दिसून येत आहे.चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे.

चोरट्यांनी काल रात्री दसेरा मैदान, ऐंशीफुटी रोड आणि रथ गल्लीत चोरट्यांनी शाळा केली. ऐंशीफुटी रोडवरील पांडव प्लाझा या इमारतीत चार प्लॅट फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला.  तसेच दसेरा मैदानजवळील सिध्दी विनायक अपार्टमेंटजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जाणार्‍या युवकावर जीव घेणा हल्ला देखील चोरट्यांनी केला. यावेळी दार बंद करुन आरडाओरड केल्यामुळे चोरटे शस्त्रास्त्रे टाकून पळून गेले. चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत.

शहरातील ऐंशीफुटी रोडवर पांडव प्लाझा या इमारतीत ए-विंगमधील तीन प्लॅट आणि बी-विंगमधील एका घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे. ए-विंगमधील प्लॉट नं. 4 मध्ये सीए मनिष डिगंबर मुनावत हे राहतात. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. प्लॉट नं. 5 ए मध्ये डॉ. अमरसिंग हजारी हे राहतात. त्यांच्या घरातून एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 50 हजाराचे डायमंडचे घड्याळ असा मुद्देमाल चोरुन नेला. डॉ.   हजारी हे परिवारासह बाहेरगावी गेलेले असतांना ही चोरी झाली.

ए-6 प्लॅटमध्ये महेश मदनलाल मालपाणी हे राहतात. ते पाच दिवसापुर्वी राजस्थान येथे देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे समजते.

बी-विंगमधील प्लॉट नं. 9 मध्ये शैलेश शामकुमार गौंड हे राहतात. ते देखील बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरातून दहा हजाराची रोकड, सात ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, लहान मुलांची अंगठी, कानातील टोंगल असा मुद्देमाल चोरुन नेला.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

पोलिसांना या ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून चार चोरटे इको मारुती गाडीतून आल्याचे दिसत आहेत. तोंडाला कपडे बांधलेल्या या चोरट्यांपैकी एक जण सीसीटीव्हीसमोर नाचतांना व अपंग असल्याचे नाटक करतांना दिसत आहे. तर चोरी करुन गाडीने चोरटे दसेरा मैदानकडे रवाना झाल्याचे दिसत आहे.

सिध्दी विनायक अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न 

दसेरा मैदान जवळील सिध्दी विनायक अपार्टमेंटमध्ये सकाळी 5.28 वाजेच्या सुमारास मारुती गाडीतून चार चोरटे उतरले. त्यांनी दिलीप पाटील यांचे बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी समोरील प्लॅटमध्ये राहणारे सुरेश अग्रवाल यांचा मुलगा आशिष हा मॉर्निंग वॉकसाठी दरवाजा उघडून घराबाहेर निघत असतांना चोर दरवाजातच उभा असल्याने त्यातील एकाने आशिष याच्या पोटाला चालू लावून चुप बैठ असे हिंदीतून धमकावले तर दुसर्‍या एकाने टॉमीसारखी वस्तू डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी आशिषचे वडील सुरेश अग्रवाल हे मागे उभे असल्याने त्यांनी तात्काळ दरवाजा बंद करुन घेतला. त्यामुळे आशिष बचावला. त्यावेळी आरडाओरड केल्याने चोरटे पळून गेले.

ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न

शहरातील रथ गल्लीजवळ असलेले जगदीश ज्वेलर्स हे दुकान आज पहाटे फोडण्याचा प्रयत्न झाला. मोटार सायकलीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीचे कॅमेरे फोडून दुकानाचे शटर उचकावले. मात्र आतील ग्रीलचा दरवाजा चोरट्यांकडून उघडला नाही. त्यामुळे त्यांना रिकामे हाती परतावे लागले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!