Type to search

धुळे

माजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक

Share

धुळे | दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज धुळे न्यायालयाने फेटाळला असून सायंकाळी प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी डॉ़ देशमुख यांना ताब्यात घेतले आहे़

याबाबत अधिक माहिती अशी की, दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार माजीमंत्री हेमंत देशमुख, तीन तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे, तीन तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास १५ कोटींचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले. घरकुल योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे ते सदस्य होते म्हणून त्यांना देखील आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांना न्यायालयानेे अद्याप जामीन दिलेला नाही, याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण दहा आरोपी करण्यात आले. गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून तीन नगराध्यक्ष, तीन मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरता जामीनावर आहेत.

दोंडाईचा शहरात ७७ कोटींची घरकुल योजना राबवून देखील त्याचे नित्कृष्ठ दर्जाचे काम करणे, एवढा शासनाचा पैसा खर्च करून योजनेतील निधीच्या पैशाने बांधकाम झालेली शाळा स्वतः च्या ज्ञानोपासक शिक्षण सस्थेच्या शाळेला विनामूल्य देणे, योजनेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या कत्तलखानाला नाममात्र भाडयाने देणे, याशिवाय घरकुल योजना राबविताना जी खाजगी जागेवर राबविणे असे विविध आरोप डॉ. हेमंत देशमुख यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

जिल्हा न्यायालयात १९ जुलै रोजी झालेल्या कामकाजात डॉ. हेमंत देशमुख यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली होती़ शासनाकडून जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तंवर, तर डॉ.देशमुख यांच्याकडून सोनवणे, ओस्तवाल, तर फिर्यादी नगराळे यांच्याकडून ऍड. दुसाने यांनी बाजू मांडली होती़ न्यायाधीश उगले यांनी जामीन अर्जावर सोमवारी निर्णय दिला असून सदर जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून डॉ. देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले आहे़

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित गिरधारी रामराख्या यांच्या जामीन अर्जावर २८ जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुनावणी होणार आहे़

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!