अकलाड येथे दोन घरातून दीड लाखांचा ऐवज लंपास

0
धुळे । दि.28 । प्रतिनिधी-तालुक्यातील अकलाड प्र.नेर येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम असलेली लोखंडी पेटी घरातून चोरुन शेतात नेली आणि त्याठिकाणी ती फोडून ऐवज लांबविल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात प्रकाश उत्तम माळी यांनी फिर्याद दिली.

धुळे तालुक्यातील अकलाड प्र.नेर येथील प्रकाश उत्तम माळी आणि अर्जुन भगवान बाविस्कर हे जवळ जवळच राहतात. दि.26 जुलै रोजी रात्री माळी आणि बाविस्कर कुटुंबीय झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी माळी यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

तसेच त्यांच्या घरातील एक लोखंडी पेटी घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात नेवून फोडली. या पेटीतून सुमारे एक लाख 20 हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले. अशाच पध्दतीने चोरट्यांनी बाविस्कर यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडले.

त्यानंतर लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे 15 हजार रुपये आणि सुमारे सात ग्रॅम वनजाचे सोन्याचे टोंगल असे एकूण एक लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. दरम्यान, चोरट्यांनी माळी यांच्या घरातून पेटी लांबविल्यानंतर बाविस्कर यांच्या घरात चोरी केली.

त्यानंतर शेतात सुरक्षितस्थळी पेटी आणल्यावर ती फोडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात प्रकाश माळी यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाला जीवे मारण्याची धमकी – शेतीसंबंधी न्यायालयात केलेली केस मागे घ्यावी या कारणावरुन एका तरुणास मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील हरणबर्डी येथे घडली. या संदर्भात संशयित तिघांविरुध्द शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय उंदर्‍या पावरा (वय 23, रा.हरणबर्डी, ता.शिरपूर, ह.मु.अकुलखेडा, ता.चोपडा, जि.जळगाव) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार आजोबांनी शेतीसंबंधी कोर्टात केलेली केस मागे घ्यावी, या कारणावरुन संजय पावरा यास शिकार्‍या नांदला पावरा, जाड्या बकर्‍या पावरा, चंपा बकर्‍या पावरा, रा.हरणबर्डी यांनी संगनमताने हाताबुक्क्यांनी मारहाण करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि.26 जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली. या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द भादंवि 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

आईसह मुलाला मारहाण – लग्नपत्रिकेतील नावे खालीवर का केली याबाबत विचारणा करणार्‍या तरुणाला मारहाण केल्याची घटना अवधान येथे घडली. या वादात तरुणाच्या आईलाही मारहाण करण्यात आली. नितीन राजेंद्र पवार (रा.अवधान, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नपत्रिकेतील नावे खालीवर का केले याबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने भाईदास त्र्यंबक पवार, विकास भगवान पवार, राकेश हरी ठाकरे व अन्य एक, सर्व रा.अवधान यांनी संगनमताने नितीन पवार यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईलाही हातावर मारुन दुखापत करण्यात आली. या फिर्यादीवरुन संशयित चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ पाटील करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*