शेतीच्या वादातून हाणामारी : पाच जखमी; गुन्हा दाखल

0
धुळे । दि.4 । प्रतिनिधी-शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील एकुण पाच जण जखमी असून 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रवींद्र बुधा कोळी, रा.वडजाई, ता.धुळे हे पिक पेरणीकरीता शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. यावेळी वाल्मीक अभिमन कोळी, खुशाल अभिमन कोळी, ज्ञानेश्वर वाल्मीक कोळी, गोपीचंद वाल्मीक कोळी, दौलत किसन कोळी, रा.जुवार्डी, ता.भडगाव यांनी वाद घातला.
यावेळी काठ्या-लाठ्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.रवींद्र कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत रवींद्र बुधा कोळी, रवींद्र बन्सीलाल कोळी, बळीराम कोळी हे दोघे जखमी झाले आहेत. तर याच घटनेत खुशाल वाल्मीक कोळी, रा.जुवार्डी, ता.भडगाव यांनीही पोलिसात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे की, शेतात बाजरीच्या पिकाची पेरणी केलेली असताना टिलर मारुन पिकाचे नुकसान केले.

याबाबत विचारणा केली असता रवींद्र बुधा कोळी, राजेंद्र कोळी, बबन कोळी, सुनंदाबाई कोळी, छायाबाई कोळी, अंजनाबाई कोळी, ज्ञानेश्वर कोळी, नितीन कोळी, सचिन कोळी, राजेंद्र सूर्यवंशी, दीपक कोळी, रवींद्र बळीराम कोळी, सखुबाई कोळी, शोभा कोळी, रा.सर्व वडजाई, ता.धुळे यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात ज्ञानेश्वर वाल्मीक कोळी, खुशाल वाल्मीक कोळी, रा.जुवार्डी हे दोघे जखमी झाले आहेत.

महिलेची पोत लंपास – झोपेत असताना महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपयांची सोन्याची पोत लंपास केल्याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे एका संशयितावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत मालूबाई राजेंद्र माळी (वय 45), रा.शेवाळे या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, योगेश धनराज कोळी हा संशयित घराच्या दरवाजातून प्रवेश करुन आत शिरला.

यावेळी त्याने 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ लंपास केली. दि.29 जून रोजी ही घटना घडली. या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विवाहितेचा छळ – दुकानासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शहरातील गुरुनानक सोसायटीतील चार जणांविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सौ.खुशबू पंकज कटारिया (वय 32), रा.गुरुनानक सोसायटी, साक्रीरोड या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुकान व्यवसायासाठी पाच लाख रुपये माहेरुन आणावेत, यासाठी सासू सौ.दुर्गाबाई मनोहरलाल कटारिया, पती पंकज मनोहरलाल कटारिया, मावस सासू सौ.सरोजिनी गोपालदास कटारिया आणि नणंद रश्मी मनोहरलाल कटारिया, रा.गुरुनानक सोसायटी यांनी शारीरिक व मानसिक छळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली व माहेरी पाठवून दिले. सौ.खुशबू यांच्या तक्ररीवरुन वरील चार जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महिलेची आत्महत्या – मुलाच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपये माहेरुन आणावेत, यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याने महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

या प्रकरणी काळखेडे येथील आठ जणांविरुध्द तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र शिवदास बोरसे, रा.मोराणे, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी रुपाली हिचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

माहेरुन 50 हजार रुपये आणावेत म्हणून छळ झाल्याने विषारी औषध प्राशन करुन रुपालीस आत्महत्या करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी शालीग्राम चिंधा पाटील, तुळशिराम शालिग्राम पाटील, कल्पना तुळशिदास पाटील, दिनेश शालिग्राम पाटील, रवींद्र शालिग्राम पाटील, धनराज शालिग्राम पाटील आणि अमोल तुळशिराम पाटील, पूनम पाटील यांच्याविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकल अपघातात एक ठार, तीन जखमी – मोटारसायकल अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. हाडाखेड गावाजवळ हा अपघात घडला.

याबाबत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कृष्णपाल सिताराम सोनवणे, रा.सांगवी, ता.शिरपूर हा एमएच 18 बीबी 5052 या क्रमांकाच्या मोटारसायकलने शिरपूरकडून सांगवीकडे येत होता.

भरधाव वेगात मोटारसायकल असल्याने पुढे चालणार्‍या मोटारसायकलीस धडक बसली. यावेळी त्याने त्याच्या पाठीमागे बसलेल्या रामदास हरदास कोळी (वय 30), रा.सांगवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तर या अपघातात राजू मुरलीधर डंबाळ (वय 30), संजय लकडू कोळी (वय 35), कृष्णपाळ सिताराम सोनवणे (वय 45) सर्व राहणार सांगवी हे तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी कृष्णपाल सिताराम सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सव्वा लाखांचे सोयाबीन लंपास – एमएच 04 एफयु 8672 या क्रमांकाच्या कंटेनरच्या दरवाजाचे बनावट चावीने कुलूप उघडून सोयाबीनचे 120 कट्टे चोरट्याने लंपास केले. प्रत्येकी 50 किलो वजनाचे हे कट्टे सुमारे एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे होते. या प्रकरणी ब्रिजेश कैलास यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*