शिरडाणे येथे विष घेवून शेतकर्‍याची आत्महत्या

0

धुळे । दि.3 । प्रतिनिधी-शिरडाणे, ता.धुळे येथे 55 वर्षीय शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात काहीतरी विषारी औषध घेवून आत्महत्या केली.

त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिरडाणे, ता.धुळे येथे राहणारा शेतकरी सुखलाल उत्तम भदाणे (वय 55) याने दि.1 जुलै रोजी रात्री 11.15 वाजता स्वत:च्या शेतात काहीतरी विषारी औषध घेतले.

त्याला त्याचा मुलगा भैय्या सुखलाल भदाणे यांनी दि.2 जुलै रोजी उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सुखलालला डॉ.शोहेब शहा यांनी तपासून मृत घोषित केले.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात पोहेकाँ जे.एस.ईशी यांनी माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ ए.एस.ठाकरे हे करीत आहेत.

अपघातात ठार – छडवेल-नंदुरबार रस्त्यावरुन एमएच 39 के 6972 क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन डबलसीट विटावे येथून छडवेलमार्गे सिंदबनकडे जात असताना वळण रस्त्यावर भरधाव वेगाने मोटारसायकल चालविल्याने मोटारसायकल घसरली. या अपघातात गोपीचंद रामू बागूल (वय 50), रा.विटावे हा जागीच ठार झाला तर न्हावी कौतिक गांगुर्डे (वय 60) हा जखमी झाला. मोटारसायकलचे नुकसान व अपघात केल्याप्रकरणी न्हावी कौतिक गांगुर्डे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे मयत गोपीचंद बागूलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.दोंडाईचा-चिमठाणे रस्त्यावरुन एमएच 18 डब्ल्यू 8807 क्रमांकाची अ‍ॅपेरिक्षा भरधाव वेगाने नेत असताना चिमठाणेनजिक रिक्षा उलटली. या अपघातात ईश्वर हिंमत माळी, रा.मेथी हा ठार झाला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात शरद उर्फ छोटू देवगिर गोसावी यांनी फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे ईश्वर हिंमत माळी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ ए.एस.वाडीले हे करीत आहेत.

तरुणाला मारहाण – कोठारे, ता.धुळे येथील भिलाटीत राहणारा धाकू परशूराम भिल याने दारुच्या नशेत काही कारण नसताना दि.1 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पिंटू परशूराम भिल (वय 36), रा.कोठरे यांच्याशी वाद घातला. या वादात धाकू भिलने पिंटू यांच्या डोक्यावर विट मारुन जखमी केले. तर गोरख चंदू भिल याने पिंटू व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ केली, अशी फिर्याद सोनगीर पोलिस ठाण्यात पिंटू परशूराम भिल यांनी दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे धाकू परशूराम भिल, गोरख चंदू भिलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल चोरी – शहरातील गवळे नगरात राहणारे राहूल अशोक वाडीले यांनी त्यांच्या मालकीची एमएच 18 एव्ही 8231 क्रमांकाची 40 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये लावलेली होती. अज्ञात चोरट्याने दि.30 जून रोजी दुपारी एक वाजता सदर मोटारसायकल चोरुन नेली. याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात राहूल अशोक वाडीले यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्री शहरातील रुपाई नगरात राहणारे प्रशांत दिनकरराव सूर्यवंशी यांनी त्यांच्या मालकीची एमएच 18 एई 8493 क्रमांकाची 15 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल साक्री बसस्टँड आवारात लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरुन नेली. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात प्रशांत सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक झाल्टे हे करीत आहेत.

मोबाईल चोरी – साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलजवळून संजय भाईदास पाटील, रा.धुळे यांचा सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल दि.2 जुलै रोजी दुपारी दोन वाजता अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात संजय भाईदास पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणी बेपत्ता – नरडाणा येथील रेल्वे स्टेशन भागात राहणारी जयश्री धर्मेंद्र कोळी (वय 20) ही दि..2 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता घरात कोणाला न सांगता निघून गेली. ती रंगाने सावळी असून तिची उंची पाच फूट सहा इंच आहे. तिने निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व सफेद रंगाचा टॉप परिधान केला आहे. जयश्री बेपत्ता झाल्याबाबत जितेंद्र सखाराम कोळी यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

जळाल्याने मृत्यू – विंचूर, ता.धुळे येथे राहणारी ज्योत्स्नाबाई चंद्रकांत पगारे (वय 32) ही दि.28 जून रोजी दुपारी एक वाजता स्वत:च्या राहत्या घरात जळाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला हेमचंद्र रवींद्रनाथ पाटील यांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना डॉ.रमेश काचेरी यांनी तपासून ज्योत्स्नाला मृत घोषित केले. याबाबत पोहेकाँ जे.एस.ईशी यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोना सोनार हे करीत आहेत.

तरुणाला मारहाण – जामजावदा, ता.शहादा येथे राहणारे राधेश्याम ओंकार ठाकरे (वय 25) यांना मुलांच्या भांडणात सहभागी झाल्याच्या संशयावरुन पळासनेर बसस्टँडजवळ दादू पूना चारण याने काठीने मारहाण केली. यात राधेश्याम हा जखमी झाला. याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात राधेश्याम ओंकार ठाकरे यांनी फिर्याद दिली. भादंवि 325 प्रमाणे दादू पूना चारणविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकूने भोसकले – शिवखट्याळ, ता.साक्री येथे राहणारा शेतकरी किसन तुळशिराम सूर्यवंशी यांच्याशी त्यांचा सख्खा भाऊ बाबुराव तुळशिराम सूर्यवंशी याने वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरुन वाद घातला. दि.30 जून रोजी सायंकाळी सहा वाजता किसन हा बाबुरावशी चर्चा करीत असताना शेतीचा हिस्सा देणार नाही, असे सांगून चाकूसारख्या धारदार हत्याराने किसनच्या मानेखाली भोसकून जखमी केले तर काशिबाई बाबुराव सूर्यवंशी आणि बायटीबाई बाबुराव सूर्यवंशी यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली, अशी फिर्याद पिंपळनेर पोलिस ठाण्यात किसन तुळशिराम सूर्यवंशी यांनी दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे बाबुराव तुळशिराम सूर्यवंशी, काशिबाई बाबुराव सूर्यवंशी आणि बायटीबाई बाबुराव सूर्यवंशी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*