कौटुंबिक वादातून एकास मारहाण; गाडी जाळली

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-कौटुंबीक वादातून साला-मेहुण्यामध्ये झालेल्या वादातून एकाला मारहाण करून त्याची मोटारसायकल जाळली.
ही घटना शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी शिवारात घडली. याप्रकरणी नाना सदा ठेलारी (वय 41, रा.अभयपूर, ता.शिरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

दि.24 रोजी रात्री नऊ वाजता नाना सदा ठेलारी हे तर्‍हाडी गाव शिवारातून मोटारसायकलने जात असताना सरपंच कैलास भामरे यांच्या शेताजवळ नारायण भगवान ठेलारी याच्यासह हरी भगवान, वसंत भगवान आणि गोसावी भगवान, सर्व राहणारा काकदे, ता.शिरपूर यांनी त्यांना अडविले. नारायण ठेलारी हा नाना ठेलारी यांच्या बहिणीला नांदवत नसल्याने नाना ठेलारी आणि नारायण ठेलारी यांच्यात वाद झाला.

या वादाचा जाब विचारीत चौघांनी नाना ठेलारीस हाताबुक्क्यांनी मारहाण करीत त्याची एमएच 18 एबी 7184 क्रमांकाची मोटारसायकल जाळली. यावरुन शिरपूर पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

धुळ्यात दारु पकडली – शहरातील हॉटेलच्या मागे लपून सुरु असलेल्या दारु विक्री करणार्‍यांवर पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली.

यात शहरासह साक्री तालुक्यातील मालपूरचा समावेश आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेलमागे अवैधरित्या दारु विक्री करतांना एकाला रात्री रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी पोकाँ राहूल पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दि.25 रोजी रात्री 8.30 वाजता मालेगाव रोडवरील हॉटेल गौरवच्या मागे पोलिसांनी तपासणी केली असता बंडू श्रीधर शिंदे (वय 48, रा.ग.नं.5, धुळे) याला रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्याकडून विदेशी कंपनीचे नाव असलेल्या दारुच्या दोन हजार 870 रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील कासारे गावात पांझरा नदी किनारी असलेल्या हॉटेल पांझराच्या मागे बेकायदेशीरपणे दारु विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने साक्री पोलिसांनी तेथे काल रात्री 7.30 वाजता छापा टाकून कारवाई केली.

यावेळी सुरेश यशवंत ठाकूर (वय 55, रा.मालपूर, ता.साक्री) याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून चार हजार 876 रुपये किंमतीचा देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली.

याप्रकरणी पोकाँ तारासिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन सुरेश ठाकूरविरुध्द साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला ठार – चूल पेटवतांना रॉकेलचा भडका उडाल्याने 27 वर्षीय विवाहिता जळून मरण पावल्याची घटना देवी, ता.शिंदखेडा येथे घडली.

याबाबत सुनील सोमनाथ मालचे, रा.देवी याने पोलिसात खबर दिली. त्यानुसार दि.25 रोजी दुपारी फिर्यादीची पत्नी येडूबाई सुनील मालचे (वय 27) ही देवी गावातील राहत्या घरात चूल पेटवित असताना अचानक रॉकेलचा भडका उडाला आणि त्यात ती जळाली. पहाटे 4.15 वाजता ती मरण पावली.

तरुणी बेपत्ता – मैत्रीणींना लग्नपत्रिका देण्यासाठी म्हणून घराबाहेर गेलेली तरुणी बेपत्ता झाल्याची घटना वणी, ता.धुळे येथे घडली.

याबाबत अलका किशोर खैरनार यांनी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पूनम किशोर खैरनार ही 24 वर्षीय तरुणी दि.25 रोजी सकाळी दहा वाजता वणी येथून धुळे शहरात मैत्रिणींना लग्नपत्रिका देवून येथे, असे सांगून निघाली. मात्र, ती सायंकाळ झाली तरी परत आी नाही.

 

 

LEAVE A REPLY

*