कम्युनिटी रेडिओचा रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-गरीबी मुक्त, रोजगार युक्तसह महिला सशक्तीकरणाची विचारधारा घेऊन चालणार्‍या देशबंधू अण्ड मंजू गुप्ता फाऊंडेशनचा कम्युनिटी रेडिओचा उपक्रम कौतुकास पात्र असून तो अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.
धुळे येथील एस.आर.पी. एम.च्या समारोहम सभागृहात देशबंधू मंजूगुप्ता फाऊंडेशनतर्फे आयोजित रेडिओ पांझराचे उद्घाटन व पिंपळनेर परिसरात बांधण्यात आलेल्या 225 सिमेंट बंधार्‍यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.प्रभू बोलत होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, खा.ए.टी.पाटील, खा.डॉ. हीना गावित, आ.अमरिश पटेल, आ.डी. एस.अहिरे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह विविध बचत गटाच्या महिला, शेतकरी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.प्रभू म्हणाले, सर्वसामान्य जनता विकास कामांसाठी सरकारला साकडे घालत असते.

खर्‍या अर्थाने विकास साधण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे याचे चांगले उदाहरण देशबंधू मंजूगुप्ता फाऊंडेशनच्या माध्यमातून पहायला मिळते.

जिल्हा गरिबीमुक्त होण्याचा विडा उचललेल्या या फाऊंडेशनने ग्रामीण भागातील जनतेपर्यंत विविध उपक्रम पोहचविण्यासाठी सुरु केलेला पांझरा रेडिओ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत या माध्यमातून विकास कामांना विकास यात्रेचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

225 सिमेंट बंधार्‍यांचे लोकार्पण- शेतकर्‍याची खरी गरज म्हणजे पाणी आहे ही गरज ओळखून जिल्ह्यातील 225 सिमेंट बंधार्‍यांचे यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, रोजगार हमी व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल व श्रीमती प्रभू यांच्या हस्ते अनुक्रमे जामखेली, मदारी नाला, सूर नदी, वाघी नदी, टेंभे येथील सिमेंट बंधार्‍यांचे लोकार्पण करण्यात आले, तर देशबंधू ण्ड मंजू गुप्ता फाऊंडेशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केले मनोगत- यावेळी विविध महिला बचत गटाच्या महिला व शेतकरी याठिकाणी उपस्थित होते. यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची नांदी झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. लाभार्थी शेतकर्‍यांनी या संस्थेकडून मिळणार्‍या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*