ग्रामीण युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र फायदेशीर

0
धुळे । दि.23 । प्रतिनिधी-रिझर्व बँक व अग्रणी बँकेमार्फत जिल्ह्यात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र मार्च 2011 साली स्थापन करण्यात आले.
या निवासी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार तरूण सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
नगाव शिवारातील गोंदूर रोडलगत असलेल्या जागेत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या उभारण्यात येणार्‍या इमारतीच्या भुमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपक्षेत्रीय प्रबंधक श्री. हरीलाल, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक श्री.डिसूझा, नाबार्डचे महाव्यवस्थापक विवेक पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक प्रदीप गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक आर.पी.भदाणे, भारतीय स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बूध, जिल्हा मध्यवर्ती बँकेंचे व्यवस्थापक धीरज चौधरी यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील बेरोजगार युवक/युवतींना केंद्रस्थानी ठेवून स्वयंरोजगाराच्या माध्यामातून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरेल आणि या निवासी प्रशिक्षण केंद्राच्या पंचसुत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे.

यासारखी भारतात 4 हजार 600 तर राज्यात 7 प्रशिक्षण केंद्रे असून जिल्ह्यातील या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठी तालुक्यातील नगाव शिवारातील 80 आर इतकी जागा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या जागेवर पुढील वर्षभरामध्ये सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येणार असून एकावेळी किमान 80 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभाग घेऊ शकतील, असेही जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यावेळी म्हणाले.

यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक आर.पी.भदाणे यांनी उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पाबद्दल माहिती देतांना सांगितले की, भारत सरकार, ग्रामीण विकास मंत्रालय तसेच एन.आय.आर.डी. हैदराबाद यांनी या प्रकल्पासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केला असून उर्वरित निधी हा सेंट्रल बँक ऑफ इंडीयामार्फत देण्यात येणार आहे.

या निवासी प्रशिक्षण केंद्रामध्ये 10 ते 30 दिवसांच्या मर्यादेमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण सत्र विनामूल्य राबविण्यात येतील.

तसेच या प्रशिक्षण केंद्रामधुन प्रशिक्षीत होणार्‍या कुशल व अकुशल प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध बँकांमधून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री.भदाणे यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*