Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या

‘ते’ आले, ‘त्यांनी’ केले जनतेला अभिवादन

Share

धुळे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज दि.२२ ऑगस्ट रोजी धुळ्यात आली. शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून महारॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला हात उंचावून अभिवादन केले.

एमपी ०४ पी.ए. ३५८८ क्रमांकाच्या वाहनावर असलेली महाजनादेश यात्रा शहरात दुपारी ४.५० वाजता शिवपुतळ्याजवळ आली. यात्रा रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अन्न औषध प्रशासन व पर्यटन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, खा.सुभाष भामरे, धुळे भाजपा शहर जिलहाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी आदी मान्यवर होते. नागरिकांना हात उंचावून रथातील सर्व मान्यवर अभिवादन करीत होते. धिम्यागतीने यात्रा पुढे पुढे सरकत होती. इमारतीवरुन रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली जात होते. तर अनेकठिकाणी रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी ५.१३ वाजता यात्रा महात्मा गांधी पुतळा चौकाजवळ आली. त्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ झाली. मोठा पुल मार्गाने दत्तमंदीर चौकात यात्रा आली. सरळ जुना आग्रारोड मार्गाने यात्रा नगावबारीपर्यंत गेली. तेथे यात्रेचा समारोप झाला.

मनपाकडून स्वच्छता- मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात येणार असल्यामुळे महापालिकेतर्फे आग्रारोडची स्वच्छता करण्यात आली. तसेच मनोहर चित्रमंदिरजवळ असलेल्या शिवपुतळ्याचीही स्वच्छता करण्यात आली.

आकर्षक रांगोळ्या- महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी शहरात जुना मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी रांगोळीतूनच मुख्यमंत्री व महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात आले.

वाहतुकीसाठी रस्ता बंद- जुना मुंबई-आग्रा महामार्ग हा गजबजलेला मार्ग आहे. परंतु महाजनादेश यात्रा येणार असल्यामुळे दुपारी ३ वाजेपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ठिकठिकाणी बॅरेकेट्स लावून वाहतूक थांबविण्यात आली होती.

रस्त्याच्या कडेला नागरीक उभे- महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी शिवपुतळ्यापासून तर नगावबारी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरीक उभे राहुन त्यांनी महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात उंच करुन जनतेला अभिवादन केले. तर काही ठिकाणी हात जोडून नमस्कार केला.
उत्स्फुर्त व्यापार्‍यांचा बंद- महाजनादेश यात्रा ही बाजारपेठेतून गेली. यात्रा येण्यापुर्वी व्यापार्‍यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली व मुख्यमंत्र्यांना अभिवादन केले.
ढोल ताशांचा गजर- महाजनादेश यात्रेचे स्वातगत करण्यासाठी ढोल ताशांचा गजर केला जात होता. या यात्रेत तरुण-तरुणींपासून अबालवृध्द सहभागी झाले होते.
प्रचंड पोलीस बंदोबस्त- महाजनादेश यात्रा धुळ्यात येणार असल्यामुळे शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोर्जे हे देखील धुळ्यात उपस्थित होते.

वाहनांचा ताफा
यात्रेत महाजनादेश रथ सर्वात पुढे होता. त्यानंतर वाहनांचा ताफा होता. त्यात व्हीआयपी व्यक्तींच्या गाड्या, पोलीस वाहने, अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहीका या वाहनांचा समावेश होता.

रथातूनच मुख्यमंत्र्यांनी शिवपुतळ्याला केले अभिवादन
महाजनादेश यात्रेचा प्रारंभ शिवपुतळ्यापासून झाला. त्याठिकाणी शिवपुतळ्याला मुख्यमंत्री अभिवादन करणार होते. परंतु रथयात्रा तेथे आल्यानंतर रथातून मुख्यमंत्री फडणवीस खाली उतरलेच नाही. इतर मान्यवरही रथावरच स्थानपन्न होते. तर खा.सुभाष भामरे हे रथावरुन खाली उतरले. त्यांनी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

फेटेधार्‍या महिलांचा सहभाग
महाजनादेश यात्रेत फेटे घालून महिला दुचाकीवर बसुन सहभागी झाल्या होत्या. तर काही महिला यात्रेत पायी देखील चालत होत्या.

पोलिसांची मानवी साखळी
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शिवपुतळ्याजवळ येण्यापुर्वी पोलिसांनी मानवी साखळी करुन रस्ता बंद केला होता. फक्त महाजनादेश यात्रा रथ व मान्यवरांनाच आतमध्ये प्रवेश होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!