राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे योगदान मोठे !

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो.
यानिमित्त आज सकाळी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. या दिंडीचा समारोप सामाजिक न्याय भवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

सामाजिक न्याय दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

त्यानंतर दिंडी शहराच्या वेगवेगळ्या मार्गावरुन जात सामाजिक न्याय भवनात पोहोचली. तेथे समारोप झाला. यावेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष टी. एम. बागूल, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे (धुळे ग्रामीण), समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त के. जी. बागूल, जिल्हा समाजकल्यायण अधिकारी हर्षदा बडगुजर, सचिव पी. बी. नाईक, विमल बेडसे, मीना बैसाणे, विलास कर्डक, शंकरराव थोरात, प्राचार्य अडसूळ, म. ना. जोशी, उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक आरक्षण लागू करुन समाज कसा पुढे जावू शकेल याविषयी विचार केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबरोबरच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनीही समाजाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.

त्यांच्या चरित्राचे वाचन केल्यास आपल्याला नवीन दृष्टी प्राप्त होईल, असेही त्यांनी नमूद केले. व्यसनांचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत.

त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी केले. सहाय्यक आयुक्त श्री. बागूल यांनी सामाजिक न्याय दिनाची माहिती विशद केली.

यावेळी स्वच्छता व व्यसनमुक्तीची शपथ जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी उपस्थितांना दिली. तसेच व्यसनमुक्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी भास्कर अमृतसागर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारीत पोवाडा सादर केला. यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

LEAVE A REPLY

*