प्रजा वार्‍यावर, राजा सुटीवर !

0

धुळे । दि.11 । विलास पवार-सीईओ हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख मानले जातात. यंत्रणेकडून घडणार्‍या चांगल्या-वाईट घटनांचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होत असल्याने सोईओ या नात्याने या घटनांची कारणे शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर येवून पडते.

‘पीआरसी’दौर्‍यादरम्यान घडलेल्या लाच प्रकरणात आमदाराला लाच देतांना ‘डेप्युटी सीईओ’ पकडला गेला असून त्यानंतर दुसर्‍या – तिसर्‍याच दिवशी सीईओ आठवडाभराच्या सुटीवर गेले आहेत. अतिशय कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित झालेले डी. गंगाथरण यांनी अशी भूमिका का घेतली आणि प्रशासनाला वार्‍यावर का सोडले? त्यांच्या या मौनामागचे रहस्य कोणाला उमजलेले नाही.

धुळे जि.प.चे सीईओ म्हणून डी. गंगाथरण यांना रुजू होवून जेमतेम तीन महिने झाले आहेत. दाखल होताच त्यांनी जि.प.प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. कार्यालयांमधील स्वच्छता, कर्मचार्‍यांचा पोषाख, राहणीमान आणि विविध योजनांची अंमलबजावणी या बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. गंगाथरण यांच्या शिस्तीची कर्मचारी – अधिकार्‍यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

जिल्हा परिषदेला खूप वर्षांनी कर्तव्यकठोर अधिकारी लाभल्याची भावना जिल्हावासियांच्या मनात निर्माण झाली आहे. गंगाथरण रुजू होताच तीन महिन्यांनी पीआरसी कमिटी दौर्‍यावर आल्याने डी.गंगाथरण यांच्या कामाची पध्दत कमिटी सदस्यांना पसंतीला उतरेल, त्यांच्या कारभाराचा उदोउदो होईल, अशी जि.प.वर्तुळात चर्चा होती.

आधीच कडक शिस्तीचे ‘सोईओ’ आणि त्यात पीआरसींचा दौरा यामुळे जि.प.पासून ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच यंत्रणा कामाला लागली होती. मात्र डेप्युटी सीईओ तुषार माळी आमदाराला लाच देतांना सापडल्याने पीआरसीचा दौरा वेगळ्याच कारणाने गाजला. यातून अत्यंत कमी दिवसात नव्या ‘सीईओं’ना धुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे दर्शनही झाले.

लाच देताना सापडलेले तुषार माळी ज्या पदावर नुकतेच रुजू झाले होते, त्याच पदावरील शेखर रौंदळदेखील महिनाभरापुर्वीच लाच घेतांना पकडले गेले होते. फरक एवढाच रौंदळ पैसे घेतांना सापडले होते तर तुषार माळी पैसे देतांना सापडले आहेत.

पीआरसीच्या दौर्‍यानंतर समितीकडे आलेल्या तक्रारींसंदर्भात सोईओंची साक्ष नोंदविली जाते. मंत्रालयात होणार्‍या साक्षीत सीईओ गंगाथरण आपली काय भूमिका मांडतात आणि या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सध्या सीईओ आठवडाभराच्या रजेवर आहेत. तर उपमुख्य अधिकारी तुषार माळी पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे जि.प.ची यंत्रणा बुचकळ्यात आहे. पीआरसी दौर्‍यादरम्यान घडलेल्या लाच प्रकरणामुळे धुळे जिल्हा परिषदेची पुन्हा एकदा राज्यभर बदनामी झाली आहे.

यातील शुक्राचार्यांचा शोध घेतलाच पाहीजे. मात्र या लाच प्रकरणाचे राजकारण होणार नाही ना? नको त्याचा बळी जाणार नाही ना? अशा अनेक शंका जि.प. कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या मनात आहेत.

 

LEAVE A REPLY

*