विविध कारणांनी सेवा समाप्त केलेल्या होमगार्डला दिलासा मिळणार!

0
धर्मेंद्र जगताप
धुळे । विविध कारणांनी सेवा समाप्त केलेल्या होमगार्डच्या सेवेचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांना संघटनेत सामावून घेण्यासाठी सशर्त संधी देण्यात यावी असे निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात विविध कारणांनी सेवा समाप्त केलेल्या होमगार्डला दिलासा मिळणार आहे.

होमगार्ड स्वयंसेवक हे मानसेवी असल्याने त्यांना कर्तव्यासाठी मानधन दिले झाले. होमगार्ड हे पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावित असतात. त्यामुळे होमगार्डच्या विविध मागण्यांसाठी नुकतीच मुंबईत बैठक घेण्यात आली. त्यात विविध कारणांनी सेवा समाप्त केलेल्या होमगार्डच्या सेवेचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांना संघटनेत सामवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यात विविध कारणांनी सेवा समाप्त केलेल्या होमगार्डला दिलासा मिळाला आहे.

शारिरीक पात्रतेच्या कठोर असलेल्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे ज्या होमगार्डला पुर्ननोंदणीच्या वेळी शारिरीक चाचणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले असेल त्याला एक महिन्याचे प्रशिक्षण देवून पुन्हा होमगार्ड संघटनेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शासन निर्णय दि. 13 जुलै 2010 चा रद्द करण्यात आला आहे.

होमगार्डचे कार्य सक्षमतेने व सुरळीत होण्यासाठी होमगार्ड अधिनियम व होमगार्ड नियमात दुरस्ती करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. होमगार्ड संदर्भात विविध निर्णय घेण्यात आल्यामुळे होमगार्डला दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या संदर्भात सर्व जिल्हा समादेशकांना या निर्णयाच्या प्रती देण्यात आल्या आहेत

सेवेत सामावून घेण्यासाठी अर्ज
जिल्ह्यातील काही होमगार्डची विविध कारणांनी सेवा समाप्त केलेली आहे अशा होमगार्डने शासनाच्या या निर्णयानंतर संघटनेत सामावून घेण्यासाठी जिल्हा समादेशकांना अर्ज दिले आहेत. काही अर्ज जिल्हा होमगार्ड कार्यालयात प्राप्त झाल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

होमगार्डची कमाल वयोमर्यादा 58 वर्ष करण्याचा निर्णय
मुंबई होमगार्ड नियम 1953 मधील नियम 8 नुसार होमगार्डचा संघटनेतील कालावधी 55 वर्ष आहे. परंतु यामध्ये वाढ करुन होमगार्डची कमाल वयोमर्यादा 55 वर्षावरुन 58 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच होमगार्डचे वय 50 व 55 वर्ष पुर्ण झाल्यावर त्याची शारिरीक पात्रता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*