Type to search

धुळे राजकीय

गोटेंचा फुगा फुटला : आघाडीसाठी धोक्याची घंटा

Share

भरत चौधरी
धुळे । अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे डॉ.सुभाष भामरे यांनी विक्रमी मताधिक्क्यासह विजय संपादन केला आहे. आजच्या निकालात मोदी फॅक्टरच प्रभावी ठरला आहे. मोदी फॅक्टरमुळे मतांचे ध्रृवीकरण झाल्याचे स्पष्ट आहे. मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्यचा निकाल अतिशय बोलका आहे. लोकसंग्रामचे अनिल गोटे यांचा ‘फुगा’ फुटला असून श्री.गोटे यांना मतदारांनी जमिनीवर आपटले आहे. आगामी विधानसभा निवडणूकांचा विचार करता काँगे्रस, राष्ट्रवादीसाठी हा निकाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. विधानसभेपर्यंत वातावरण असेच कायम राहिले तर ‘कँाग्रेस मुक्त धुळे जिल्हा’ सहज शक्य होणार आहे.

मोदी फॅक्टर प्रभावी
या मतदारसंघात संपूर्ण देशाप्रमाणेच मोदी फॅक्टरच प्रभावी ठरला आहे. मोदी त्सुनामीत डॉ.भामरे यांच्या प्रतिस्पर्धीचा टिकाच लागला नाही. पुलावामा हल्ल्यानंतरच्या सर्जीकल स्टाईक नंतरच संपूर्ण मतदारसंघात वातावरण बदलले होते. पुलवामा हल्ल्यानंतर झालेली पंतप्रधान मोदींची सभा अतिशय प्रभावी ठरली. यानंतर झालेली सर्जीकल स्ट्राईक यामुळे मतदारांमध्ये मोदींची के्रझ निर्माण झाली विशेष करून तरूण मतदारांमध्ये हा प्रभाव प्रचंड दिसत होता. मतदानाच्या दिवशी उमेदवारापेक्षा मोदींना मत देण्याची भावना मतदारांमध्ये होती हेच आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

डॉ.भामरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
स्व.चुडामण पाटील यांच्या नंतर सर्वात जास्त मताधिक्य डॉ.सुभाष भामरे यांनी प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे स्व.चुडामण पाटील यांचे नातू आ.कुणाल पाटील यांच्याविरूध्दच डॉ.भामरे यांनी विक्रम केला आहे. 2 लाख 50 हजार 222 एवढे मताधिक्य प्राप्त केल्यामुळे डॉ.सुभाष भामरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. मतदार संघात केलेली विकासकामे आणि स्वच्छ प्रतिमेचे धनी असलेले डॉ.भामरे हे जिल्ह्याचे निर्विवाद नेते बनले आहेत. ना.जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघात 54 हजार 176 मिळालेल्या मताधिक्यापेक्षा डॉ.भामरे यांनी धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघात मिळून 1 लाखापेक्षा जास्तीचे मताधिक्य दुप्पटीने आहे. अनिल गोटेंना डावलण्याचा डॉ.भामरे यांचा निर्णयावर मतदारांनी शिक्कामोर्तब केला आहे.

मतांचे धृ्रवीकरण
धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, बाह्य आणि बागलाण हे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या प्रत्येक मतदार संघनिहाय निकाल अतिशय बोलका आहे. मालेगाव मध्य वगळता सर्वत्र मोदींची जादू चालली आहे. काँग्रेसचे उमेदवार आ.कुणाल पाटील यांना या एकमेव मतदारसंघात एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. हे मोदी विरोधात मतांचे धृ्रवीकरण झाल्याचे स्पष्ट दिसते तर विधानसभेत ज्या धुळे ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तेथील मतदारांनी 70 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य भाजपाच्या डॉ.भामरे यांना दिले आहे. हा मतदारसंघ रोहिदास पाटील यांच्या पासूनच काँगे्रसचा गड राहिला आहे हे विशेष. हीच परिस्थिती मालेगाव बाह्य, बागलाणची आहे. येथे हिंदू मतांचे ध्रृवीकरण होवून डॉ.भामरे यांना विक्रमी मते प्राप्त झाली आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार घेतलेला आढावा असा…

धुळे ग्रामीण
धुळे ग्रामीण मतदारसंघ म्हणजे काँगे्रस उमेदवार आ.कुणाल पाटील यांचे होमपिच. मात्र, येथील मतदारांनी दिल्लीवारीसाठी आ.पाटील यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. येथून डॉ.भामरे यांना मिळालेले 75 हजारांपेक्षा जास्तचे मताधिक्य काँगे्रससाठी चिंतेची बाब आहे. मतमोजणीच्या 19 पैकी एकाही फेरीत आ.कुणाल पाटील यांना आघाडी मिळालेली नाही हा मोठा धक्का मानला जात आहे.

धुळे शहर
या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर आणि लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे यांनी डॉ.भामरे यांना गेल्या काही दिवसांपासून खुले आव्हान दिले होते. या निवडणूकीतही डॉ.भामरेंना पराभूत करण्यासाठी त्यांनी उमेदवारी केली. मात्र, धुळेकरांनी अनिल गोटे यांचा ‘फुगा’ फोडला आहे. पाच हजार मतांचा आकडा श्री.गोटे यांनी कसाबसा पार केला. नकारात्मक राजकारणाला धुळेकरांनी नाकारले असेच म्हणावे लागेल. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने येथून डॉ.भामरेंना मिळालेले 30 हजाराच्या आसपासचे मताधिक्य शहरी मतदारांवर भाजपाची पकड घट्ट झाल्याचे संकेत देणारे आहे.

शिंदखेडा
ना.जयकुमार रावल यांचा मतदारसंघ असलेल्या शिंदखेडा मतदार संघानेही भाजपाची निराशा केली नाही. मतदारसंघात असलेले शैक्षणिक संस्थांचे जाळे यामुळे कुणाल पाटील येथे प्रभाव पाडतील ही अपेक्षा फोल ठरली आहे. ना.जयकुमार रावल यांनी केलेली विकासकामांची जादू येथे कायम असून दुप्पटीपेक्षा जास्त मताधिक्य भाजपाला मिळाले आहे. विकासाचे राजकारण, कार्यकर्त्यांची फौज, जातीपातीचे राजकारण येथे भारी पडले असून ना. जयकुमार रावल यांची मतदारसंघावरील पकड घट्ट असल्याचे सिध्द करणारी आहे.

मालेगाव मध्य
या मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त मतांचे धृ्रवीकरण झाले. हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. काँग्रेस उमेदवार आ.कुणाल पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य या एकमेव मतदारसंघतूनच प्राप्त झाले आहे. मुस्लिम मतदारांमध्ये आजही ‘पंजा’ची जादू आणि ‘मोदी’ विरोध कायम असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपाचे डॉ.भामरे यांना केवळ 4352 एवढीच मते मिळाली. मतमोजणीच्या एकाही फेरीत डॉ.भामरे यांना येथे तीन आकडी संख्येचा टप्पा गाठता आलेला नाही. आ.कुणाल पाटील यांना मिळालेल्या एकूण मतांपैकी निम्मे मते एकट्या मालेगाव मध्य मतदारसंघातून प्राप्त झाली आहेत हे विशेष.

मालेगाव बाह्य
हा विधानसभा मतदारसंघ हिंदू बहुल आहे. मालेगाव मध्य प्रमाणेच मालेगाव बाह्य प्रमाणे येथेही मतांचे धृ्रवीकरण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. मालेगाव मध्य मध्ये मोदी विरोधी मतांचे ध्रृवीकरण झाले तर बाह्य मतदारसंघात मोदी समर्थक मतदारांचे धृ्रवीकरण झाले आणि यात काँग्रेसचा सुपडा साप झाला. मालेगाव मध्य मतदारसंघातील पिछाडी भरून काढत ‘बाह्य’च्या मतदारांनी ‘मध्य’ तब्बल दीड पटीने जास्त मताधिक्य डॉ.भामरे यांना प्राप्त करून दिले. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत डॉ.भामरे दुप्पटीच्या फरकाने आघाडीवर होते.

बागलाण
या मतदारसंघात डॉ.भामरे यांना मतदारांच्या नाराजाची फटका बसेल असे चित्र निवडणूक काळात होते. येथे डॉ.भामरेंप्रमाणे कुणाल पाटील यांनाही विरोधाचा समाना करावा लागला होता. म्हणूनच येथील मतदानाबाबत कुणीच खात्रीने अंदाज व्यक्त करीत नव्हते. येथून काँग्रेसला आघाडीची अपेक्षा होती. मात्र, मोदींच्या त्सुनामीने येथेही काँग्रेसचा सुपडा साफ करून टाकला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा अपवाद वगळला तर उर्वरित एकाही फेरीत काँग्रेसचे आ.कुणाल पाटील यांना आघाडी घेता आली नाही. काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे येथे रोष होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!