धुळ्याच्या विकासासाठी 10 कोटी!

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांची माहिती

0
धुळे । शहरातील महत्वाच्या स्टेशनरोड निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून दहा कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करून घेतला आहे. तसेच शहरातील जुने धुळे भागात भूमिगत गटारी, वॉल कंपाऊंड अंतर्गत रस्ते कामांसाठी तीन कोटी 44 लाख असा एकूण 13 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा 13 कोटी रुपयांचा निधी राज्याच्या नगरविकास विभागाकडून वितरित करण्याचे आदेश काल दि.11 फेबु्रवारी रोजी देण्यात आले आहे. यामुळे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने या सर्व विकास कामांच्या माध्यमातून सुरु झाली आहे. अशी माहिती महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली आहे.

शहरातील वाहतुकीची समस्या सोडवून नागरिकांना चांगले मजबूत, टिकाऊ रस्ते मिळावे, सोबतच शहराच्या सौंदर्यात भर पडावी आणि विकासाला चालना मिळावी म्हणून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच महापालिकेतील सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. शहराच्या मधोमध असलेल्या रेल्वे स्टेशन समोरील प्रमुख रस्ता न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण निर्मूलन केल्यानंतर मोकळा झाला. परंतु रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही. रस्ता तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून स्टेशन रोडचे विस्तारीकरण, डांबरीकरण आणि सुशोभीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या नगरविकास विभागातर्फे अवर सचिव विवेक कुंभार यांनी 11 फेब्रुवारी रोजी याबाबतचे लेखी आदेश काढले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दसेरा मैदान ते संतोषी माता चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण आणि सुशोभीकरणाचे काम या 10 कोटी रुपयांतून केले जाणार आहे. लवकरच या कामाच्या निविदा प्रसिद्ध होतील आणि शहरातील प्रमुख असलेल्या स्टेशन रोडचे काम सुरु होईल, शहरातील स्टेशन रोड भागासह मिल परिसर, स्नेह नगर, फाशीपूल, अग्रवाल नगर, दसेरा मैदान येथील वसाहतीत राहणार्‍या हजारो नागरिकांना सुसज्ज, चांगले रस्ते उपलब्ध होतील. स्टेशनरोडची निर्मिती झाल्याने संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास होऊन कायापालट होणार आहे.

3 कोटी 44 लाखाचा निधी
महापालिका क्षेत्रात मूलभूत सोईसुविधांचा विकास योजनेअंतर्गत देखील धुळे महापालिकेसाठी तीन कोटी 44 लाख 90 हजार 190 रुपयांचा निधी ना.डॉ.सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सुभाष नगर प्रभाग क्र.12 मध्ये भूमिगत गटारी तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी एक कोटी 45 लाख 21 हजार 503 रुपयांचा निधी खर्च केला जाईल. तसेच देवपूरातील प्रभातनगर येथे ओपन स्पेसला वॉलकंपाऊंड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 95 लाख 27 हजार 130 रुपयांचा निधी खर्च केला जाईल. चितोडरोड परिसरातील राजहंस कॉलनी, साक्री रोड येथील राजहंस कॉलनी आदी भागात रस्ते, गटारींची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी देखील 52 लाख 7 हजार 802 रुपये निधी वापरला जाईल. मोहाडी उपनगरात रस्तानिर्मितीसाठी 24 लाख 20 हजार 559 रुपये आणि सुयोग कॉलनीतील ओपन स्पेसला वॉलकंपाऊंड, काँक्रीट गटार व रस्ता नुतनीकरणासाठी 28 लाख 13 हजार 196 रुपये खर्च केला जाणार आहे. शहराला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी ही सर्व कामे महत्वाची ठरणार असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*