बिलाडीत श्रमदानातून जलसंधारणाची कामे

धुळ्यातील व्यापार्‍यांचा उपक्रम, दर रविवारी श्रमदान करणार

0
धुळे । धुळे जिल्हा दुष्काळ मुक्त होवून सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून विविध प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत धुळे व शिंदखेडा तालुक्यातील 200 गावांनी सहभाग नोंदविला आहे. या गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे सध्या सुरू आहेत. त्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होत असून धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी दर रविवारी धुळे तालुक्यातील बिलाडी गावात श्रमदान करीत आहेत.

धुळे व शिंदखेडा तालुक्यातील 200 गावांत 7 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वत: विविध गावात जात श्रमदान केले. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत शासकीय अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या गावांमध्ये जावून श्रमदान करीत आहेत. त्यात आता धुळे व्यापारी महासंघाची भर पडली आहे. धुळे शहरातील व्यापार्‍यांच्या विविध 19 संघटनांचा हा व्यापारी महासंघ आहे. या महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांची भेट घेवून पानी फाऊंडेशनच्या कामात श्रमदान व लोकसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी धुळे लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी धुळे व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांना बिलाडी गावात जावून श्रमदान करावे, अशा सूचना केल्या होत्या.

त्यानुसार धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडिया, धनंजय रायचूर, महेंद्र सोनार, अजय नाशिककर, सुनील रुणवाल, प्रशांत देवरे, दीपक भावसार, भिमजीभाई पटेल, मंदार महाजन आदी पदाधिकारी दर रविवारी सकाळी 6 वाजता स्वत:च्या वाहनाने घरुन बिलाडीकडे जाण्यासाठी निघतात. तेथे जवळपास दोन तास ते श्रमदान करतात. त्यासाठी आवश्यक साहित्य तेथे उपलब्ध करुन देण्यात येते. दोन तास श्रमदान केल्यावर महासंघाचे पदाधिकारी पुन्हा धुळ्याकडे परततात. गेल्या तीन रविवारपासून हा उपक्रम सुरू आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी बिलाडी गावात जावून श्रमदान करीत असतात. तेथील काम पूर्ण झाल्यावर जिल्हा प्रशासनाने सांगितले, तर दुसर्‍या गावात श्रमदानासाठी अवश्य जावू, असे श्री.रायचूर यांनी सांगितले.

उपक्रम कौतुकास्पद
धुळे व्यापारी महासंघाचा दर रविवारी बिलाडी गावात जावून श्रमदान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. श्रमदानात शासकीय अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांनीही सहभागी होत धुळे जिल्हा दुष्काळमुक्तीचा निर्धार केला पाहिजे.
-राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, धुळे

LEAVE A REPLY

*