Photo Gallery : बारीपाड्यात सरसंघचालक

0

‘बाबां’ची गाडी रस्ता चुकली अन् चिखलात फसली !

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बारीपाडा दौर्‍यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. संघाचे विविध भागातून आलेले संघाचे पदाधिकारी स्वयंसेवक, भाजपाचे आमदार, खासदार आणि मंत्री यांसह जिल्ह्यातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आवर्जुन उपस्थिती दिली होती.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे हे देखील सरसंघचालकांच्या भेटीसाठी आवर्जुन उपस्थित झाले होते. ना.डॉ.भामरे यांच्या गाड्यांचा ताफा बारीपाड्याकडे येत असताना दीड किलोमीटर अंतरावर पायलट गाडीचा रस्ता चुकला.

त्यामुळे मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या सरळ बारीपाडा जंगलाकडे गेल्या. आज या भागात दिवसभर पाऊस होता. त्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणावर झाला होता.

रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर ताफ्यातील पोलिसांची तारांबळ उडाली. याच वेळी मात्र मंत्र्यांची गाडी चिखलात रुतली. गाडी रूतल्याने अखेर ना.डॉ.भामरे यांना वाहतूक शाखेच्या एमएच 18 एफओ 194 या क्रमांकाच्या पोलिस व्हॅनमधून सरसंघचालकांच्या कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.

मंत्र्यांची गाडी रस्ता चुकल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश सोनवणे यांना कळाली आणि ते तात्काळ कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

यावेळी ताफ्यात कोण-कोण पोलिस कर्मचारी होते, पायलटला रस्ता समजला नाही का? आपसातील संवाद कमी पडला का? याबाबत त्यांनी कर्मचार्‍यांकडे चौकशी केली.

या भागात ठिकठिकाणी पोलिस तैनात असतांना पायलट वाहन रस्ता चुकले कसे, ताफ्यातील संबंधित कर्मचार्‍यांना आपण ‘शो कॉज’ नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारीपाड्यात वाहनांचा ताफा

बारीपाडा हे 800 लोकवस्तीचे गाव. मात्र आज या गावात सरसंघचालकांची भेट असल्याने वेगळेच चित्र पहायला मिळाले. बारीपाड्यात प्रवेश केल्यापासून ते बारीपाडा गाव संपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी गाड्यांचाच ताफा पहायला मिळत होता.

दोन मंत्री, खासदार यांच्यासह सरसंघचालकांच्या भेटीला आलेले विविध मान्यवर आणि मंत्र्यांसमवेत आलेले प्रशासन यांच्यामुळे बारीपाड्यामध्ये आज वाहनांचीच संख्या जास्त दिसत होती.

सरसंघचालकांना झेड सिक्युरिटी असल्याने बारीपाड्याला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. त्याचबरोबर रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने, पोलिस दलाची वाहने, वाहतूक शाखेची वाहने या ठिकाणी दाखल झालेली होती.

पाऊस असल्याने प्रशासनातील अधिकारी आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांनी बारीपाड्यातील विविध घरांमध्ये आश्रय घेतला होता. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी एका शेडमध्ये शेकोटी पेटवून पोलिस उब घेण्याचा प्रयत्न करीत होते.

बारीपाडा पर्यावरण केंद्रात सरसंघचालक थांबलेले असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

पावसाची संततधार आणि मंत्र्यांनी घेतला छत्रीचा आधार !

आज सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. सरसंघचालकांचे बारीपाड्यातील आगमन आणि पावसाचे आगमन एकाचवेळी झाले. या भागात दिवसभर संततधार सुरु होती.

अशा पावसातच संघप्रेमी बारीपाड्यात दाखल झाले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल कार्यक्रमस्थळी आले.

त्यावेळी पाऊस सुरु असल्याने दोन्ही मंत्र्यांनी छत्रीचा आधार घेतला. प्रवेशद्वारापासून येतांना सुरुवातीला दोन्ही मंत्री वेगवेगळ्या छत्रीत होते. त्यानंतर दोघांनी एकाच छत्रीचा आधार घेतला.

काही हितचिंतकांनी मंत्र्यांच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्र्यांनी स्वत:च्या हातातच छत्री घेवून पावसापासून संरक्षण केले.

नंदुरबारच्या खा.डॉ.हिना गावित यांचेही पावसात आगमन झाले. त्यावेळी छत्री घेवून काही कार्यकर्ते धावले. मात्र, त्यांनीही स्वत:च्या हातातच छत्री घेवून पावसापासून संरक्षण केले.

कार्यक्रमस्थळी ‘मिडिया’ला नो एन्ट्री

सरसंघचालक बारीपाड्यात तब्बल पाच ते सहा तास थांबणार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष होते. त्यामुळे मिडिया प्रतिनिधींनी देखील या ठिकाणी आवर्जुन हजेरी लावली.

मात्र, मिडिया प्रतिनिधींना या ठिकाणी ‘नो एन्ट्री’ असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी आलेल्या संघाशी संबंधित असलेल्यांना संघाच्या स्वयंसेवकांकडून पासेस दिल्या जात होत्या.

मात्र, मिडिया प्रतिनिधींना ना पासेस दिल्या, ना एन्ट्री दिली. त्यामुळे सरसंघचालकांचा हा कार्यक्रम मिडियापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.

LEAVE A REPLY

*