विहिरीत पडून बहिणींचा मृत्यू वडेल येथील दुर्घटना

0
कापडणे । दि.19 । प्रतिनिधी-शेतात काम करणार्‍या आपल्या आईजवळ खेळत असताना रत्ना अर्जुन हाके(वय 7) व शीतल अर्जुन हाके (वय 5) या दोन्ही सख्या बहिणींचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.
वडेल(ता.धुळे) शिवारात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आपल्या चिमुकल्या मुलींना वाचविण्यासाठी मातेने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली.
मात्र त्या मातेचे प्रयत्न निष्फळ ठरले. आईला जवळच्या शेतात काम करणार्‍या एकाने वाचविल्याने प्राण वाचले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

 

वडेल गावालगतच अर्जुन बाबुराव हाके यांचे शेत आहे. आज(दि.19) सकाळी अर्जुन हाके यांच्या पत्नी भागाबाई हाके या रत्ना व शीतल या दोन्ही मुलींसोबत त्यांच्या शेतात कापुस पिकाची निंदणी करण्यासाठी गेल्या.

निंदणीचे काम करत असतांनाच त्यांच्या दोन्ही मुली विहीरीजवळ खेळत होत्या. खेळतांना त्यांचा पाय निसटल्याने त्या विहिरीत पडल्या.

त्या विहिरीत पडत असताना भागाबाई यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. आपल्या दोन्ही चिमुरड्या मुली विहिरीतील पाण्यात गटांगळ्या खातांना पाहुन क्षणाचाही विलंब न करता व जिवाची पर्वा न करता भागाबाईंनी सरळ विहिरीत उडी घेतली.

दुर्देवाने त्यांचे प्रयत्न मात्र व्यर्थ झाले. जवळच्याच शेतात काम करत असलेले समाधान शिवराम हाके यांच्या हा प्रकार लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

समाधान हाके यांनी विहिरीत भागाबाई व त्यांच्या दोन्ही मुली पडल्याचे पाहून मदतीसाठी आरडाओरड केली व गावातील नाना माने यांच्या मदतीने त्यांनी विलंब न करता विहिरीत उडी मारली. त्यांना भागाबाई हाके(वय 33) यांना वाचविण्यात यश आले परंतू दोन्ही मुली मात्र तळाशी गेल्या.

या घटनेची माहिती देवपूर पश्चिम पोलीसांना माहिती देण्यात आली. सपोनि अभिषेक पाटील, सपोऊनि किशोर सोनवणे, हे.कॉ. युवराज बागुल, दीपक पाटील, एल.पी.शिरसाठ आदी फौजफाटा याठिकाणी पोहचला.

ग्रामस्थांच्या मदतीने सकाळी नऊ वाजता रत्ना हाके हिचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची माहिती गावात वार्‍यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

शीतलला शोधण्याचा शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर दुपारी तीन वाजता तिचा मृतदेह काढण्यात यश आले. दोन्ही मुलींचा मृतदेह पाहून भागाबाईंनी व वडिलांनी एकच हंबरडा फोडला.

या घटनेने वडेल गावावर एकच शोककळा पसरली आहे. हाके दाम्पत्यास रत्ना व शीतल ही दोनच अपत्ये होती. या दुर्घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

LEAVE A REPLY

*