निवृत्तीवेतन जिव्हाळ्याचा विषय – रेखावार

0
धुळे । राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सेवा निवृत्त होणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती वेतनासह विविध प्रकारची प्रदाने प्रदान करण्यात येत असतात. निवृत्तीवेतन हा जिव्हाळ्याचा विषय असून निवृत्तीवेतन धारकांना अनुज्ञेय असलेली सर्व प्रदाने वेळेवर प्रदान करण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकार्‍यांनी कोषागाराशी समन्वय ठेवून निपटारा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

महालेखापाल कार्यालय मुंबई, संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्री.रेखावार बोलत होते. यावेळी सहाय्यक महालेखापाल एस.एस.सरफरे, महालेखापाल कार्यालयातील अधिकारी एस.एस.बोडके, डी.एन.पुजारी, एस.एस.शिंदे, जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.रेखावार म्हणाले की, कोषागार कार्यालयामार्फत शासनाच्या प्रत्येक विभागातील प्रदाने अदा केली जातात. कोषागार हा शासनाचा आर्थिक कणा असल्याने त्यांच्यामार्फत करण्यात येणार्‍या कामकाजात पारदर्शकता व सूसुत्रता येण्यासाठी वित्त विभागामार्फत मोठ्या प्रमाणात संगणकीकरणाचा अवलंब करण्यात येत आहे. ऑनलाईन कार्यप्रणालीचा प्रभावी वापर होण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच महालेखापाल कार्यालयाच्या उपस्थितीत आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, याचा सर्व संबंधितांना लाभ घ्यावा, व कोषागाराशी समन्वय ठेवून प्रलंबीत प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी यावेळी केले.

यावेळी नियत वयोमान निवृत्तीवेतन, मुदतपूर्व सेवानिवृत्तीवेतन, स्वेच्छा सेवानिवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण, कुटूंब निवृत्तीवेतन, कर्तव्य बजावीत असताना मृत्युमूखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष कुटुंब निवृत्तीवेतन, तात्पुरते निवृत्तीवेतन यासह विविध प्रकारच्या निवृत्तीवेतनाबाबत सविस्तर मार्गदर्शन सहाय्यक महालेखापाल श्री.सरफरे, महालेखापाल कार्यालयातील अधिकारी श्री.बोडके, श्री.पुजारी, श्री.शिंदे यांनी केले.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी मनीषा कुलकर्णी, सी.एस.परदेशी, सुनील चौधरी, उदय पाठक, दिनेश खैरनार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सोनवणे यांनी केले, तर आभार राहुल पंडित यांनी मानले.

LEAVE A REPLY

*