धुळे येथे पातेल्यात पडून बहिणींचा मृत्यू

0
कापडणे । उडाणे ता.धुळे येथे खेळता-खेळता घरातीलच पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्याने पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा दुर्देवी अंत झाला.

आज दि.12 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. निकीता (3 वर्षे) व ज्ञानेश्वरी (दिड वर्षे) असे या मयत बहिणींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, उडाणे येथील निकीता भावसाहेब पाटील (वय 3 वर्षे) व ज्ञानेश्वरी भावसाहेब पाटील (वय दिड वर्षे) या दोन्ही बहिणी आज (दि.12) आपल्या उडाणे येथील राहत्या घरात खेळत होत्या. तब्बेत बरी नसल्याने या मुलींची आई राणीबाई या पुढच्या घरात आराम करत होत्या तर त्यांच्या आजीही घराच्या पुढच्या भागात घरकाम करत होत्या. घरात एकांत असतांना निकिता व ज्ञानेश्वरी या दोन्ही बहिणी खेळता-खेळता बाथरुमकडे गेल्या.

खेळतांनाच त्या अचानक पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या मुलींचे वडील भावसाहेब आण्णा पाटील हे शेतीकाम व खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत असल्याने तेही बाहेरच होते. भावसाहेब पाटील व राणीबाईंना मुलगा नव्हता. या आपल्या मुलींचा मुलाप्रमाणे सांभाळ करीत होते.

घरात मुलींची चाहूल लागत नाही म्हणून राणीबाईंना जाग आली. घरात जावून पाहिल्यावर त्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने या कुटुंबाबरोबरच गावावर शोककळा पसरली आहे. या गोंडस व बोलक्या मुलींच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*