तस्करी रोखली : 23 जनावरे पकडली

0
धुळे । कत्तलीसाठी जनावरे दाटीवाटीने बांधून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने शहरातील शंभरफुटी रोडनजीक शब्बीर नगरात एकाला चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने रंगेहात पकडले. या ठिकाणाहून 23 जनावरे सुमारे एक लाख 11 हजार रुपये किंमतीची जप्त करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शंभरफूटी रोडलगत असलेल्या शब्बीर नगरात मोहम्मद मुस्तफा अ. रशिद याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी गायी व वासरु कुठून तरी आणून चोरटी विक्री करण्यासाठी व कत्तलीसाठी दाटीवाटीने घरालगतच्या तळमजल्यातील मोकळ्या जागेत बांधून ठेवली. या ठिकाणाहून एक लाख 11 हजार रुपये किंमतीच्या 20 गायी व तीन वासरु जप्त केल्या. याबाबत पोलिस कर्मचारी धिरज घनश्याम गवते यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन प्राणी निदर्यतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम सन 1960 चे कलम 11 (ड) (एफ) अन्वयेसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सन 2015 5 (1) (अ) 5 (ब) प्रमाणे मोहम्मद मुस्तफा अ. रशिद विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गळफास घेवून आत्महत्या- रायपूर, ता. साक्री येथे राहणारा भिला दगा मोरे (वय55) याने भडगाव शिवारातील शेतात बाभुळाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शिरसाठ हे करीत आहेत.

तरुण शेतकर्‍याची विष घेवून आत्महत्त्या
नाणे, ता. धुळे येथे राहणारा गोविंद आनंदसिंग देवरे (वय28) याने स्वत:च्या शेतात काहीतरी विषारी औषध घेतले. त्याला त्रास होवू लागल्याने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. अरुणकुमार नागे यांनी तपासून गोविंद देवरेला मृत घोषित केले. गोविंद देवरेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे नाणे गावावर शोककळा पसरली.

मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ
धुळे शहरातील एकतानगरात राहणारी प्रिया सचिन कदम या विवाहितेला मुलगी झाल्याने तिचा छळ करुन तिला शिवीगाळ व दमदाटी केली तसेच विवाहितेचा पती सचिन वसंतराव कदमसह पाच जणांनी मारहाण केली. याबाबत प्रिया कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन भादंवि 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे विवाहितेचा पती सचिन वसंतराव कदम, सासू उमा वसंतराव कदम, नणंद डिम्पल वसंतराव कदम, वैशाली वसंतराव कदम, दीर मयुर वसंतराव कदम सर्व रा. अहमदाबाद यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सोनवणे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*