जखमी शिक्रा पक्ष्याला दिले जीवदान

0
धुळे । जिल्हा परिषद समोर जखमी अवस्थेत शिक्रा पक्षी आढळला त्यास वन्यजीव संरक्षक किरण कांबळे यांनी जीवदान दिले.त्यांनी शिक्रावर प्राथमिक उपचार करून त्याला पशुवैद्यकीय डॉ. कोलूमवार यांच्याकडे जाऊन पुढील उपचार केले व अन्न पाणी देऊन सुयोग्य स्थितीत वन विभागाकडे सीएफ संजय पाटील, आरएफओ शितल नगराले यांच्या सुपूर्द केले व अशाप्रकारे एका मुक्या जीवाचा प्राण वाचवला या पक्ष्याबद्दल सखोल माहिती पक्षीमित्र हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

कबुतराच्या आकाराची छोटा शिकारी पक्षी म्हणजे शिक्रा. वरील बाजूने राखट निळसर तर खालील बाजूस पांढरा आणि त्यावर तपकिरी पट्टे आणि शेपटीवर रुंद काळपट रेघांमुळे ओळखता येतो. मादीचा आकार हा नरा पेक्षा मोठा असतो आणि तिच्या वरील बाजूस तपकिरी रंग बघायला मिळतो.

हे पक्षी जंगलामध्ये जोड्याने राहताना दिसून येतात तर ग्रामीण भागात किंवा शेताच्या जवळ दाट झुडपांमध्ये त्यांचा आश्रय बघायला मिळतो.टोळ, नाकतोडे, बेडुक, उंदीर यांची शिकार करून हे प्राणी आपला उदरनिर्वाह करत असतात. शिक्रा हा पक्षी अत्यंत खुबीने शिकार करतो, आपल्या भक्ष्याला काही कळण्याच्या आतच ते पक्षी भक्ष्यावर झडप घालून त्याला उचलून नेतात आणि नखांनी ओरबाडून, फाडून खातात.

सातभाई, लाहुरी, होला यासारख्या पक्ष्यांचा पाठलाग करून शिकार करतात. कोंबड्यांची पिल्ले हे देखील शिक्रा पक्ष्याचे आवडते खाद्य आहे.शिक्रा पक्षी कोतवाल पक्ष्या प्रमाणेच आवाज काढतो परंतु आवजाची पातळी मात्र जास्त असते. विणीच्या हंगामात एकमेकांशी प्रणय क्रीडा करतांना

हे पक्षी ‘टिटुई’ असा तीव्र स्वर काढतात. प्रणयक्रीडेत हे पक्षी हवेत नाना प्रकारचे खेळ करतात व एकमेकांचा पाठलाग करतात आणि पाण्यात सूर मारतात त्याप्रमाणे हे पक्षी हवेत सूर मारताना दिसतात. गावाजवळच्या राईमधील वृक्षांवर हे कावळ्या प्रमाणेच घरटी बांधतात. शिक्रा पक्षी एका वेळेस तीन किंवा चार फिकट निळसर पांढर्‍या रंगाची अंडी घालतात. काही वेळा अंड्यांवर राखाडी रंगाचे फिकट लहानमोठे ठिपके असतात असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*