धुळे जिल्ह्यात दहावी, बारावी परीक्षेसाठी 107 केंद्रे

0
धुळे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 107 केंद्रे राहणार असून पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019 या कालावधीत होणार आहे.

बारावीसाठी 44 केंद्र- जिल्ह्यात 44 केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये सात, धुळे ग्रामीणमध्ये 14, साक्री तालुक्यात नऊ, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी सात-सात अशा एकूण 44 केंद्रावर परीक्षा होणार आहे.

दहावीसाठी 63 केंद्र- दहावीची परीक्षा जिल्ह्यातील 63 केंद्रांवर होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये 13, धुळे ग्रामीणमध्ये 17, साक्री तालुक्यात 13, शिरपूर तालुक्यात नऊ, व शिंदखेडा तालुक्यात 11 अशा एकूण 63 केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

55 हजार 72 विद्यार्थी परीक्षा देणार- बारावीची परीक्षा 25 हजार 357 तर दहावीची परीक्षा 29 हजार 715 असे एकूण 55 हजार 72 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत.

पाच भरारी पथकांची नियुक्ती- परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळातर्फे पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायटच्या प्राचार्या तसेच डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या यांचा समावेश आहे.

आठ ठिकाणी कस्टडी- प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर व ग्रामीणसाठी तीन कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी दोन कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*