धानोरे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू

0
चणेगाव (वार्ताहर)-चणेगाव-धानोरे शिवारात असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. बिबट्या विहिरीत पडल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते असफल ठरले.
धानोरे शिवारात सुभाष भाऊसाहेब दिघे यांच्या गट नंबर 372 मध्ये रोडलगत असणार्‍या विहिरीत सुमारे एक वर्ष वयाचा मादी बिबट्या भक्षाच्या नादात विहिरीत पडला. विहिरीत सुमारे 20 फूट खोल पाणी होते. बिबट्या विहिरीत पडला. त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्नही केला.
अखेर त्याने विहिरीतील कपारीचा आधार घेतला, आणि डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. यावेळी विहिरीशेजारी असणार्‍या शेतमजूर शांताबाई भानुदास वाघ या महिलेने बिबट्याचा आवाज ऐकला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले जर बिबट्या दिसला. त्यांनी ही खबर सुभाष दिघे यांना दिली.
दिघे यांनी कामगार पोलीस पाटील रंगनाथ दिघे यांना कळविले. पोलीस पाटलांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक आर. जी. देवखिळे, वनक्षेत्रपाल यु. बी. वाघ यांनी वनकर्मचारी एल. जी. किनकर, एस. आर. घनवच, एम.डी. सरोदे, आर. एल. वाबळे, वनपाल एस. एम. गायकवाड, वनरक्षक डी. पी. अडसुरे यांना घटनास्थळी पिंजरा व क्रेनसह पाठविले.
विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता समजल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. शहाजी दिघे, रमेश शिंदे, किशोर माळी, योगेश सिन्नरकर, विठ्ठल ढमक, भास्कर दिघे, किरण वारुळे, गणेश वाघचौरे, राहुल दिघे, चांगदेव दिघे, अनिल दिघे यांच्यासह वनकर्मचार्‍यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
शनिवारी मध्यरात्री विहिरीत पडलेला बिबट्या कपारीचा आधार घेऊन पाण्यावर तरंगत होता. रविवारी सकाळी वनविभागाने विहिरीत पिंजरा लावण्यास सुरुवात केली. पिंजरा सोडलाही मात्र पिंजर्‍यात जाण्याच्या नादात पुन्हा बिबट्या पाण्यात पडला.
नाकातोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनास्थळीच वनाधिकार्‍यांनी पंचनामा केला. चाचा पलघडमल व संदेश लोंढे यांंच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले. सोनगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भागुनाथ शिंदे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट्यावर डिग्रस येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*