Friday, April 26, 2024
Homeजळगावदीड वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

दीड वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

घोडगाव / धानोरा  –

येथून जवळच असलेल्या मितावली (ता.चोपडा) येथील कु.भाग्यश्री संजय इंगळे (वय 2) या बालिकेला घरासमोरील ओट्यावर दुपारी 2 वाजता खेळत असतांना सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

मुलगी रडत असल्याचे एैकुन तिची आई घरातुन बाहेर आली असता मुलीच्या हाताला रक्त लागल्याचे पाहून व तिच्या तोंडातुन फेस आल्याने तिला सर्प चावल्याची शंका आली. मुलीचे वडील व शेजारील लोकांनी मुलीला तात्काळ चोपडा येथील उपजिल्हारूग्णालय येथे उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी भाग्यश्रीला मृत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

पोलीस विभागातर्फे पंचनामा करण्यात आला. डॉ.पंकज पाटील यांनी शवविच्छेदन करून मुलीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर, सर्पमित्र सागर बडगुजर, गिरीराज ग्रुपचे दिपक पाटील, मितावलीचे माजी सरपंच चंपालाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार कोळी यांनी सहकार्य केले.

विशेष असे की, दोन वर्षापुर्वी ह्याच मुलीच्या आईला त्याच ठिकाणी सर्पदंश झाला होता. त्यांचेवर जळगाव येथील जिल्हा रूग्णालय येथे उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात यश आले होते. काही दिवसांपुर्वी तेथेच सर्प निघाल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये घबराट पसली होती.

सर्पमित्र सागर बडगुजर यांनी ह्या घटनेची सविस्तर माहीती घेऊन तेथील ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवर सर्प पकडण्यासाठीची उपाययोजना सांगीतली. इकडे दवाखान्यात मुलीचे शवविच्छेदन सुरू होते, तिकडे ग्रामस्थांचे सर्प पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेर सर्पमित्र सागर बडगुजर यांनी सांगीतलेल्या उपाययोजने नुसार तासाभराच्या अथक प्रयत्नांनी ग्रामस्थांना सुमारे सात फुटाचा काळा नाग पकडण्यात यश आले.

यावेळी सारे गांव त्याच ठिकाणी जमा झाले होते. फुलासारखी लहान मुलगी सर्पदंशाने मृत झाल्याने गांवात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच वेळीच साप पकडण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला. रात्रीच भाग्यश्रीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या