यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का?, धनंजय मुंडेंचे ट्वीट

0
मुंबई : आज व्हॅलेंटाइन डे असून प्रत्येकजण आपापल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न विचारत टोला मारला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?’ ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.

लोकसभा निवडणूका काही महिन्यांवर आल्या आहेत. देशभरात भाजपा विरोधी वातावरण तयार करत विरोधकांनी एकत्र येण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले जुने रुसवे फुगवे विसरुन भाजपा विरोधात एकत्र लढण्याचा पण घेतला आहे. पण भाजपा-सेनेच्या युती बाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट होत नाही आहे.

नेहमी एकमेकांच्या पक्षावर आणि त्यांच्या धोरणांवर टीका करायची आणि निवडणूक आली की युती करायची हा सेना-भाजपाचा अलिखित नियम आजपर्यंत सर्वांनी पाहीला आहे. अजूनही जागावाटपावरून युतीचं घोडं अडलेलं पाहायला मिळंतय. पण हा सर्व दाखवण्याचा खेळ असून युती होणार असे विरोधकांना वाटत असून त्यांनी एकत्र येत संभाव्य युतीशी लढण्याची रणनीती आखली आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते नेहमी भाषणातून भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत असतात. यामध्ये आता धनंजय मुंडेही कुठे मागे राहीले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेले धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या खास शैलीत उत्तर दिले होते. बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

शिवसेनेने अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचीही धमकी दिली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधी पक्षांनी नेहमी टीका केली असून हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा असं आव्हानही दिलं आहे. पण अद्यापही युती कायम आहे. नेमका हाच मुद्दा घेत धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपाला टोला लगावला आहे.

 

LEAVE A REPLY

*