Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा पाचपुते समर्थकांकडून निषेध

Share

माफी न मागितल्यास श्रीगोंद्यात पाय ठेऊ न देण्याचा इशारा

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – राज्याचे माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्याबाबत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अपशब्द काढून चुकीचे वक्तव्य केले असल्याने पाचपुते समर्थकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पाचपुते यांची जाहीर माफी मागावी, जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना श्रीगोंद्यात पाय ठेऊन देणार नाही. असा इशारा पंचायत समिती सभापती शहाजी हिरवे यांनी शुक्रवारी दिला.

22 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिंतूर येथे आयोजित केलेल्या स्वराज्य यात्रेदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचा ‘बबन्या’ असा एकेरी शब्दात उल्लेख करून खालच्या भाषेत जाहीर सभेत निंदा केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचा खास शैलीत समाचार घेत आज दि.23 रोजी श्रीगोंदा येथे भाजप शिवसेनेच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निषेध नोंदविला.

तुम्ही तुमचे काका गोपीनाथ मुंडे साहेबांना दगा देऊन रक्ताच्या नात्याचा विश्वासघात करून मागच्या दाराने विधान परिषदेत गेला व विरोधी पक्षनेते झालात. तुमचा राष्ट्रवादी पक्ष संपला असून तुमचे मानसिक संतुलन बिघडल्याने तुम्ही काहीही बोलू नये. आपण आपल्या वयाचे भान ठेऊन पाचपुते यांची जाहीर माफी मागावी अन्यथा आपल्याला श्रीगोंदा तालुक्यात पाय ठेऊन देणार नाही असा इशारा सभापती शहाजी हिरवे यांनी दिला. धनुभाऊ.. तुम्ही जेव्हा चड्डीत होते तेव्हा आमचे नेते विधानसभेत होते असा फलक घेत नायब तहसीलदार डॉ. ए. बी. ढोले व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे,नगरसेवक शहाजी खेतमाळीस, शिवसेनेचे तालुकप्रमुख भाऊसाहेब गोरे, काका कदम, संतोष खेतमाळीस , दत्ता कोठारी, पोपट खेतमाळीस,राजेंद्र उकांडे, एम. डी. शिंदे, प्रतिक बनकर आदींसह भाजप सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!