देवळाली प्रवरातून आणखी दोन तरूणांना अटक

0

पाच आरोपी पोलिसांच्या रडारवर; भंगारवाल्यावर पोलिसांची वक्रदृष्टी
आरोपींना पाठीशी घालण्याचा गाव पुढार्‍यांचा प्रयत्न; मास्टरमाईंड मोकाट

 

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)- दुकानफोडी, दुचाकी चोरी, वीजपंप चोरी व इतर चोर्‍यांसंदर्भात गुरूवारी देवळालीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्यानंतर रात्री उशिरा देवळाली प्रवरा पोलिसांनी या सोनेरी टोळीतील आणखी दोनजणांना अटक केली. त्यामुळे आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली असून आणखीही काही पांढरपेशा कुटुंबातील तरुण या गुन्ह्यात सामील असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

 

गुरूवारी तीन जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांना बनावट क्रमांकाच्या सात दुचाकी मिळाल्या. मात्र, या गुन्ह्यातील मास्टरमाईंड असलेला टोळीचा म्होरक्या पोलिसांना हुलकावणी देत असून तो अद्याप पसारच आहे. पोलीस त्याच्या मागावर असून मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर चोरीच्या मोटारी व अन्य चोरीचा माल घेणार्‍या भंगारवाल्यावरही पोलिसांची वक्रदृष्टी गेली आहे.

 

गुरूवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी देवळाली प्रवरा पोलीस चौकीला भेट देऊन बुट्या तथा प्रसन्न सुरेश पंडित व निखिल राजेंद्र येवले या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी शौकत पठाण, संदीप गाडेकर व दीपक बर्डे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या रडारवर अजून चार ते पाचजण आहेत. आरोपींकडून पोलिसांनी दोन बजाज प्लॅटिना, तीन हिरो स्प्लेंडर, एक होंडा ड्रीम युगा व एक बजाज पल्सर अशा सात दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. या दुचाकींचे इंजिन नंबर व चेसी नंबर पोलिसांनी प्रसिद्ध करून देखील अद्यापपर्यंत दोन दुचाकी मालक पोलीस स्टेशनला आले आहेत. आज दिवसभर मात्र, कोणीही न आल्याने पोलिसांसमोरच्या अडचणीत भर पडली आहे .

 

 

परिसरातील अनेकांचे विद्युतपंप चोरीस गेले आहेत. दिवाळीच्या सुमारास अनेक घरफोड्या व एकवीस दुकाने देखील फुटली आहेत. परंतु पोलिसांत फिर्याद दाखल करण्यास कुणी पुढे येत नसल्याने आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात अडचण येत आहे. याबाबत पोलिसांनी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात या दुचाकींचे इंजिन व चेसीनंबर कळविले असून लवकरच मूळ मालकांचाही तपास लागणार आहे.

 

परंतु या कारवाईतील प्रमुख सूत्रधार अद्याप मोकाटच आहे. या गुन्ह्यातील चार आरोपी हे प्रतिष्ठित घरातील असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या आरोपींकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून राहुरी कारखाना येथील साईशान मोटारमधून चोरीस गेलेल्या इंडिका कार चोरीचीही शक्यता या टोळीकडून व्यक्त होत आहे.

 

दुचाकी चोरीतील त्या आरोपींची संख्या मोठी असून  काही गावपुढारी त्यांना  पाठीशी घालत असल्याची चर्चा होत  आहे. यामुळे म्हातारी मेल्याचे दु :ख नाही, परंतु काळ सोकावतो, अशी स्थिती सध्या गावात आहे. या सर्व प्रकाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून गावचं गावपणच हरवून गेल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.

LEAVE A REPLY

*