Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

देवगड फाट्याजवळ कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू

Share

लग्नाच्या वर्‍हाडाचे वाहन थांबले असता रस्ता ओलांडताना काळाचा घाला

एक महिला निपाणी वडगावची तर दुसरी जळगाव जिल्ह्यातील; दोघीही नवरदेवाच्या नातेवाईक

देवगडफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील नगर -औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा पासून एक किलोमीटर अंतरावर हॉटेल दत्त दिगंबर समोर रस्ता ओलांडत असलेल्या दोन महिलांना भरधावकारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. मयत महिला श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथून लग्नाच्या वर्‍हाडात लासूरकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील नवरदेवाच्या लग्नाचे वर्‍हाड औरंगाबाद जिल्यातील लासूर जवळील भानवाडी येथे चालले होते. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी वर्‍हाडातील एक टेम्पो देवगड फाटा पासून एक किलोमीटर अंतरावर थांबला. यामध्ये काही महिला व पुरुष वर्‍हाडी होते. त्यातील काही महिला लघुशकेसाठी रस्ता ओलांडत असताना औरंगाबादहून नगरकडे जाणार्‍या एका कारने त्यांना जोराची धडक दिली त्यात या महिला जागीच ठार झाल्या.
मंगल सुनील काळे (वय 45) रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर तसेच ताराबाई संतोष वनवे (वय 53) रा. आडगाव ता. एरंडोल जि. जळगाव ही मयत महिलांची नावे आहेत.

त्यांचे मृतदेह नेवासा फाटा येथे ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. उशिरापर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. टेम्पोतील सर्व वर्‍हाडींच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने सर्वाना मोठा धक्का बसला. मृत्यू पावलेल्या महिला नवरदेवाच्या जवळच्या नातेवाईक होत्या. धडक दिलेल्या कारच्या चालकाने कार न थांबवता पळ काढला. गवते व इंगळे या कुटंबाच्या लग्नाला हे वर्‍हाड चालले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!