Friday, April 26, 2024
Homeनगरविकास आराखडा ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ

विकास आराखडा ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ

पुणतांबा ग्रामपंचायत सरपंचासह बहुतांशी सदस्यही गैरहजर

पुणतांबा (वार्ताहर) – गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाठ फिरविली. तसेच सरपंच व बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्यामुळे पुणतांब्याच्या विकासाबाबत गावच्या विकासाच्या गप्पा मारणारे नेते व ग्रामस्थ किती जागृत आहे, याचा प्रत्यय दिसून आला.

- Advertisement -

शनिवारी 11 वाजता गावच्या विकासाचा आराखड्यावर चर्चा करण्यासाठी उपसरपंच वंदना धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य श्याम माळी, सर्जेराव राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी डी. के. राऊत, डॉ. घालम, नामदेव धनवटे, प्रताप वहाडणे, जे. डी. धुमाळ, अरुण बाबरे, डॉ. बखळे, संदीप वहाडणे आदींसह शिक्षण व आरोग्य विभागाच्या काही सेवकांसह 20 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या गावच्या ग्रामसभेत 30 ते 40 ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी उशिरा सुरू झालेल्या ग्रामसभेचे प्रास्ताविक केले. यावेळी नामदेव धनवटे यांनी नियमानुसार ग्रामसभेची सूचना 7 दिवस अगोदर दिली पाहिजे, आपण काल 29 तारखेचा उल्लेख करून फलकावर सूचना लावली हे कायदेशीर नाही. या बाबीकडे लक्ष वेधले. मात्र या मुद्यामुळे ग्रामविकास अधिकारी निरूत्तर झाले व त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी गावच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, शेतकरी, महिला व बालकल्याण युवक प्रशिक्षण, अनु. जाती, जमाती पर्यावरण तीर्थस्थळ, धार्मिक ठिकाण विकास, पशुसंर्वधन, वृक्षारोपण, अपंग व्यक्तीसाठी योजना माहिती व तंत्रज्ञान, ग्रंथालय, सौर उर्जा, गाव सुशोभीकरण या घटकावर चर्चा करून विकास आराखड्यात कोणत्या बाबींचा समावेश करावयाचा आहे, याबाबत सूचना करण्याचे आवाहन केले. विकास आराखडा तयार केल्यामुळे 15 व्या वित्त आयोगात पुरेसा निधी मिळेल. तसेच प्रत्येक वर्षासाठी आराखड्यानुसार विकासाच्या योजना प्रभावीरित्या राबविता येईत, असे स्पष्ट केले.

पुणतांबा- चांगदेवनगर रस्त्याच्या विद्युतीकरणाचा आराखड्यात समावेश करण्याची सूचना डॉ. बखळे यांनी केली. शिक्षण विभागाशी निगडीत मागण्यांची यादीच सोमनाथ वैद्य यांनी सादर केली. वीज विभागाच्या प्रतिनिधीने ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईनवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते, ही बाब निर्दशनास आणून दिली. कृषी विभागाचे धुमाळ यांनी कृषी योजनांची माहिती दिली. यावेळी अरुण बाबरे, प्रताप वहाडणे, सर्जेराव जाधव, महेश कुलकर्णी, डॉ. बखळे यांनी चर्चेत भाग घेतला. ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याबद्दल नाराजीचे वातावरण होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या