Type to search

वैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी

माझं नाशिक

वैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी

Share

आजही आपल्या शहरातीलच नव्हे तर देशातील आरोग्य यंत्रणांचा भार जास्तीत जास्त खासगी व्यावसायिक उचलतात. सरकारी व खासगी व्यासायिकांनी कार्पोरेट कंपनींच्या मदतीने एक वास्तववादी योजना आखून सर्वसामान्य जनतेस याचा उपयोग होईल, अशा यापद्धतीने नियोजन केल्यास वैद्यकीय विकासात नाशिक शहर नक्कीच सुदृढ होईल.

परंतु, अनेक वास्तववादी योजना मनात व अस्तित्वात असूनही भ्रष्टचाराच्या राक्षसीवृत्तीमुळे आपण याचा लाभ घेऊ शकत नाही. आजही आपण ठरवले तर नाशिक शहराचा, राज्याचा व देशाचा विकास मग तो कुठल्याही वैद्यकीयसह कुठल्याही क्षेत्रात असो सहज होऊ शकतो. गरज आहे ती प्रचंड इच्छाशक्तीची.

आजही आपल्या आदिवासी भाग, खेडीच नव्हे तर अगदी आपल्या शहरातील जनतेला वैद्यकीय सुविधेची वाणवाच आहे. तरुण पिढीला या सर्व यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत व तरुणाईने सुद्धा या सर्व गोष्टींचा कसा उपयोग करून घ्यायला हवा या संबंधी विचारमंथन होणे आवश्यक आहे.

जसे आपण बघतो की, परदेशात विशेषकरून इंग्लंड व अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात वैद्यकीय व्यवस्थेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण या सर्व सुविधा या नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरिता सर्वात महत्त्वाचा दुवा ठरतेय ती वैद्यकीय विमा योजना. तेथील पद्धती अतिशय पुढारलेली आहे तेथील अर्थव्यवस्था अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही वैद्यकीय सुविधा पुरवते. तेथील या सर्व गोष्टी होण्यामागे त्यांची करप्रणाली, शिक्षण, समाज नागरी कायदा व किमान वेतन कायदा या सर्व बाबी कारणीभूत आहेत.

हे झाले पाश्चिमात्य देशांबद्दल आता आपण आपल्या तरुणाईला आपल्या देशातील वैद्यकीय व्यवस्थेबद्दल काय अपेक्षित आहे व तो विकास कसा घडवता येईल याबद्दल आज आपण जर आपल्या शासकीय सेवांचा विचार केला तर या सेवा देणारी सरकारी दवाखाने, तेथील वैद्यकीय अधिकारी व स्टाफ आपल्या परीने सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, आपल्या प्रचंड लोकसंख्येमुळे या सर्व सेवा अपूर्ण ठतात.

आज सरकार वैद्यकीय सुविधांसाठी भरमसाठ पैसा खर्च करते, परंतु यातून घेतलेली औषधे, वैद्यकीय उपकरणे ही सर्व जनतेपर्यंत पोहोचतात काय, त्यावर अंकुश ठेवणारी एक गैरसरकारी, रकारी प्रमाणिक संस्था, ऑडीट टीम यावर हवी. म्हणजे संपूर्ण सरकारी मदत जनतेपर्यंत पोहोचेल.

सरकारी रुग्णालयातील काही ओपीडी रिसर्च करतात. उदा. काही ओपीडी किंवा शहरातील खासगी व्यावसाय करणार्‍या व्यावसायिकांनी एकत्र येऊन काही ग्रुप बनवावे व रोटेशन पद्धतीने स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातील एक किंवा दोन तास किंवा जास्त वेळ देऊन सरकारी वैद्यकीय सुविधांना हातभार लावावा.

अनेक दानशूर मंडळी व कॉर्पोरेट संस्था, सरकारी अनुदान यांच्या मदतीने एक मध्यवर्ती संस्थेची स्थापना करून त्या मार्फत निधी संकलन करून सर्वसामान्य व गरीब जनतेस काही आरोग्य कार्डस् द्यावे जेणेकरून हे कार्ड वापरून जनतेस कमी पैशात चांगला प्रकारच्या खासगी सुविधा मिळवता येतील.

आजच्या काळाची गरज पाहता, सर्वसामान्य जनतेस वैद्यकीय सुविधा मिळण्याकरिता एक संस्था स्थापनेची गरज आहे. कार्पोरेट कंपन्यांचे फर्म, शासनाचा फंड आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व विविध कार्यक्रमातून तसेच विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांमधून मिळणार्‍या दानातील काही हिस्सा असा निधी संकलित करून संस्थेचे कामकाज चालविण्यात यावे.

यामधून गरीब जनतेचे आरोग्य कार्ड तयार करून विशिष्ट मर्यादेपर्यंत विविध तपासण्या किंवा शस्त्रक्रियांसाठी लागणार्‍या सुविधा अशा सर्व गरजेच्या सेवा माफक दरात देता येणे शक्य आहे. याद्वारे केवळ शासकीय वैद्यकीय संस्थांचा भार कमी होऊन सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सेवा देता येणे शक्य आहे. नव्हे याद्वारे आपण आपल्या शहर तसेच राज्यभरातील दुर्लक्षीत गरीब जनतेला अपेक्षेपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा पुरवून खरा आरोग्यदायी विकास घडवू शकतो.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!