देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : कॅमेरा माझा साथीदार – माया खोडवे

0
माया खोडवे
*  सुमारे १०० हून अधिक व्हिडिओच्या माध्यमातून बदल घडवला
*  चीनमध्ये झालेल्या ‘क्लायमेट चेंज’च्या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
*  बीबीसीसह अनेक प्रसार माध्यमांकडून कामाची दखल
*  ‘सपन सरल’ या चित्रपटाची निर्मिती
सामान्य माणूस कायमच करत आलेला कचरा वेचण्यापासून माझा जीवनाचा प्रवास सुरू झाला. मात्र काही तरी वेगळे करायचे या धडपडीतून वेगवेगळे कोर्सेस करून संस्थाच्या माध्यमातून शिकत राहिले. याच गडबडीत ‘कॅमेरा’शी ओळख झाली. अवघं आयुष्यच बदलून गेले. याच कॅमेर्‍याची गट्टी जमली. लोकांचे प्रश्‍न मांडण्याची शक्ती सापडली. अनेक प्रश्‍नांना वाचा फोडून सरकार दरबारी जाब विचारला. समुदाय पत्रकारितेतून लोकांना न्याय मिळवून दिला. पुढे हाच विचार अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सपन सरल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
माझ जन्मगाव जालना आहे. घरात आम्ही पाच भाऊ-बहिणी आहोत. आई-वडील शेती करायचे, मात्र आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यामुळे शिक्षण घेण्याची साधी संधीसुद्धा नव्हती. वयाच्या तेराव्या वर्षी अर्थात साल २००२ मध्ये माझे लग्न झाले आणि मी नाशिकला आले. इथेही काही चित्र वेगळे नव्हते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी कचरा वेचण्याचे काम सुरू केले. मात्र हे काम करत असताना लोकांच्या वाईट नजरा मनाला कायमच खूप त्रास देऊन जात.
त्याचवेळी कागद, काच, पत्रा वेचक कष्टकरी संघटनेशी ओळख झाली. या संघटनेमार्फत आमच्यासारख्या महिलांसाठी रोजगारनिर्मितीकरिता मेणबत्ती निर्मिती, शिवणकाम, पार्लर यासारखे अनेक कोर्सेस चालवले जात. मी ते सर्व कोर्सेस केले. त्यात एकदा कायद्याबाबत ट्रेनिंग होत. शिक्षण झालेले नसताना माझी धडपड पाहून ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली. ट्रेनिंगनंतर वस्तीवर कायदा सल्ला केंद्र सुरू केले. यातून खूप शिकायला मिळाले. वेगवेगळे सर्वे, बचत गट तयार करणे, जन्म-मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड काढून देणे अशी लोकांची अनेक कामे केली.
पुढे स्वत:ची श्रमजीवी नावाची संस्था स्थापन केली. साल २०१० मध्ये कचरा वेचक संघटनेमार्फत चीनमध्ये ‘क्लायमेट चेंज’च्या जागतिक परिषदेत भारताच प्रतिनिधित्त्व करायला मिळाले. तिथे कचरा वेचणारी लोक पर्यावरण संवर्धनाला मदत यावर मी वीस मिनिटे बोलले. तिथे कॅमेराशी पहिल्यांदा ओळख झाली. पुढे अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटच्या समुदाय व्हिडीओ अंतर्गत कॅमेरा हाताळणीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर तिथेच आम्ही कचरा वेचक, रेशन माझे हक्काचं आणि घरकुल हे समस्या मांडणारे व्हिडीओ बनव ले. यातून झालेला बदल मी अनुभवला. मग व्हिडीओ निर्मितीच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. व्हिडीओ वॉलेंटीअर या संस्थेमार्फत समुदाय पत्रकारितेच शिक्षण घेतले. हातात कॅमेरा आला आणि भ्रष्टाचार, आरोग्य, रस्ते, अशा अनेक लहान मोठ्या प्रश्‍नांना वाचा फोडली. सुमारे शंभराहून अधिक व्हिडीओ बनवले आणि बदल घडवून आणला.
दरम्यानच्या काळात रोजगारासाठी स्वत:चा फोटो स्टुडीओ ही सुरू केला. आता व्हिडीओच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्‍नांची जाण आली आहे. त्यावर लोकांशी बोलण्याची गरज ओळखून आनंद पगारे यांच्या मदतीने ‘सपन सरल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात एखाद्या सरकारी योजनेचा कसा बोजवारा उडतो, हे दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटात मी अभिनयसुद्धा केला आहे. विशेष म्हणजे गायक रवींद्र साठे यांनी चित्रपटात गाणं म्हटलं आहे. तर ‘कोर्ट’ चित्रपटाचे अभिनेते वीरा साथी यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाची निर्मिती माझ्यासाठी एक मोठा संघर्ष ठरली आहे. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.
माझ्या आतापर्यंतच्या कामाची दखल बीबीसीसह अनेक प्रसार माध्यमांनी घेतली आहे. सोबत अनेक संस्थानी माझ्या कामाचा गौरवही केला आहे. हे सगळे पाहून आता आई-वडिलांना माझा सार्थ अभिमान वाटतो. सुरुवातीला त्यांनाही मी काय करतेय, ते समजत नव्हते. त्यावेळी अनेकदा त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली असली तरी कायमच पाठिंबा दिला आहे.
आता त्यांना माझ्या कामाचे कौतुक वाटते. मला महिलांना सांगावेसे वाटते की, आयुष्यात कायमच शिकण्याची भूमिका घ्यायला हवी. थोडेसे तरी धाडस अंगी ठेवायला हवे. आपल्या कामावर विश्‍वास ठेवून लोक काय म्हणतील, हे करू की नको, असा विचार करणे चुकीचे आहे. कायम संधी शोधत राहा. आपल्या कामातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा.

LEAVE A REPLY

*