Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत संवाद कट्टा : सार्वजनिक मालमत्तांच्या संवर्धनासाठी लोकशिक्षण आवश्यक

Share

देशदूत संवाद कट्ट्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा

नाशिक । प्रतिनिधी

दिड हजार कोटींचे बजेट असणार्‍या नाशिक महापालिकेकडून शहरातील सार्वजनिक मालमत्तांचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकांमध्ये देखील संवेदनेचा अभाव असल्यानेच आज घंटागाडी आली तरी अनेकदा कचरा रस्त्यावरच टाकला जातो किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळायचे असेल आणि माझे शहर स्वच्छ आणि सुंदर आहे हि संकल्पना रुजवायची असेल तरतर प्रभावी लोकशिक्षणाची गरज आहे. यासाठी महापालिकेसोबतच शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी एकत्रित पुढाकार घेण्याची गरज असल्याची अपेक्षा देशदूत संवाद कट्ट्यावरून व्यक्त करण्यात आली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची नाशिकची एक पिढी सामाजिक भान जपणारी होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण या पिढीतील लोक आजदेखील स्वच्छता, आरोग्य, सार्वजनिक मालमत्तांची काळजी घेणे याबाबत सजग आहेत. मात्र आताच्या पिढीला या गोष्टींचे सोयरसुतक राहिले नसून सार्वजनिक मालमत्तांच्या विद्रुपीकरणाला जणू पुढाकारच घेतला जात असल्यासारखी परिस्थिती आहे.

स्वतःच्या घराची, घरातील वस्तूंची ज्याप्रकारे काळजी घेतली जाते. त्याप्रकारे घराबाहेर पडल्यावर आपले वर्तन विरोधाभासाचे असते असा सूर देशदूत आयोजित संवाद कट्ट्यात आळवण्यात आला.सार्वजनिक मालमत्ता लोकांच्या करांच्या पैशांतून उभ्या राहिल्या आहेत. मात्र ही बाब सर्वच जण दुर्लक्षित करतात. राजकीय आणि सामाजिक उद्रेकावेळी या मालमत्तांचे नेहमीच नुकसान होते. परदेशातील नागरिक मात्र याबाबतीत काळजी घेत असल्याचे चित्र असून त्यांच्यातील शहाणपण आपल्या लोकांमध्ये येण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी सामाजिक भान बाळगले पाहिजे.

त्याबरोबरच रस्त्यात घाण करणारे, थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी आपल्यातील लेखनकला दाखवणार्‍यांना खरेतर हटकवणे गरजेचे आहे. मात्र जो यासाठी पुढाकार घेतो त्याला शहाणपणा शिकवला जातो. त्याची खिल्ली उडवली जाते. न्यायालयांपासून तर शाळा, महाविद्यालये, कार्पोरेट कार्यालयांमध्ये कोपर्‍यात आणि जिन्यांमध्ये देवतांची छायाचित्रे लावण्याची क्रेझ काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र, त्या देवतांची देखील विटंबना करायला लोक मागेपुढे पाहत नव्हते. हे एकप्रकारे नैतिक अधःपतन असून प्रबोधन करूनही लोक दुर्लक्ष करणार असतील तर त्यांची मानसिकता बदलायची कोणी असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

गेल्या काळात महात्मा गांधींनी केलेली आंदोलने जनतेच्या हक्कांसाठी सरकार विरोधात असहकार पुकारून व्हायची तर आज माणसे गोळा करून दहशतीचा अवलंब केला जातो. अशा आंदोलनातून काय साध्य होणार हो चिंतनाचा विषय आहे. रेल्वे, बससेवा या आपल्या सोयीसाठी असतात. मात्र आपण त्याचा किती काळजीपूर्वक वापर करतो ? प्रशासनावर खापर फोडून आपण नेहमी मोकळे होतो. मात्र, आपल्यातलीच कोणीतरी तिथे नुकसान केलेले असते हे विसरतो.

मद्यपींकडून रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घातला जातो. त्याला अटकाव करायला देखील आपण पुढाकार घेत नाही आणि पोलिसांवर दोष देऊन मोकळे होतो. यातून सामाजिक भान आपण हरवले असल्याचे जाणवते याकडे चर्चेत सहभागी झालेल्या माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, सामाजिक कार्यकर्ते घुगे, जितेंद्र भावे, मनोज घोडके, राजू जाधव, शंकर पांगरे यांनी लक्ष वेधले. देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सूत्रसंचलन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!